
जागतिक हवामान संघटना (WMO)ने यंदाच्या वर्षाच्या उत्तरार्धात एल निनो (El Nino) निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली असून त्यामुळे हिंदुस्थानच्या मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र सध्या याबाबत निश्चित निष्कर्ष काढणे लवकर ठरेल, असे हवामान तज्ज्ञांचे मत आहे. सामान्यतः एल निनोच्या वर्षात मान्सूनच्या पावसावर नकारात्मक परिणाम होतो.
जागतिक हवामान संघटनेच्या ताज्या अद्ययावत माहितीनुसार, मार्च ते मे या कालावधीत जगभरात जमिनीवरील तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचे संकेत आहेत. विविध हवामान घटकांमुळे ही परिस्थिती निर्माण होत असून त्याचा परिणाम हिंदुस्थानातही जाणवत आहे. देशातील अनेक भागांत सध्या उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेची लाट अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) मंगळवारी दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवसांत जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात कमाल तापमान सरासरीपेक्षा 5 ते 7 अंश सेल्सियसने जास्त राहण्याची शक्यता आहे. तसेच दिल्ली-एनसीआरसह उत्तर-पश्चिम हिंदुस्थानातील मैदानी भाग, गुजरात आणि मध्य प्रदेशात तापमान 4 ते 6 अंश सेल्सियसने जास्त राहू शकते.
याशिवाय पुढील पाच दिवसांत दक्षिण-पूर्व द्वीपकल्पीय भागात कमाल तापमान 2 ते 3 अंश सेल्सियसने जास्त राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव माधवन राजीवन यांनी सांगितले की, सध्याच्या अंदाजानुसार हंगामाच्या दुसऱ्या सहामाहीत एल निनो विकसित होण्याची शक्यता आहे आणि तो मध्यम स्वरूपाचा असू शकतो. मात्र या टप्प्यावर अंदाजांमध्ये मोठी अनिश्चितता आहे. एल निनोची स्थिती नेमकी काय राहील याबाबत अधिक स्पष्टता जूनपर्यंत मिळू शकते. त्यामुळे सध्या घाबरण्याचे कारण नसले तरी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
एल निनो म्हणजे काय?
एल निनो ही मध्य आणि पूर्व विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाच्या तापमानात मोठ्या प्रमाणावर होणारी वाढ आहे. त्याचबरोबर उष्णकटिबंधीय वातावरणातील वारे, दाब आणि पावसाच्या पॅटर्नमध्ये बदल होतात. एल निनोचा परिणाम सामान्यतः ला निना (La Nina) च्या उलट असतो. ला निना स्थितीत हिंदुस्थानात चांगला मान्सून पाऊस पडण्याची शक्यता असते.
WMOच्या महासचिव सेलेस्ट साउलो यांनी सांगितले की, पुढील काही महिन्यांत हवामान परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे, जेणेकरून आवश्यक निर्णय घेता येतील. 2023-24 मधील एल निनो हा नोंद झालेल्या पाच सर्वात तीव्र घटनांपैकी एक होता आणि त्याचा परिणाम 2024 मध्ये जगभरातील विक्रमी तापमानांवर दिसून आला.
त्यांनी पुढे सांगितले की, एल निनो आणि ला निना यांचे हंगामी अंदाज कृषी, आरोग्य, ऊर्जा आणि जलव्यवस्थापन यांसारख्या हवामानावर अवलंबून असलेल्या क्षेत्रांसाठी अत्यंत महत्त्वाचे नियोजन साधन ठरतात आणि त्यामुळे अब्जावधी रुपयांचे आर्थिक नुकसान टाळण्यास मदत होते.
WMOच्या ग्लोबल प्रोड्यूसिंग सेंटरच्या गेल्या आठवड्यातील अंदाजानुसार मे ते जुलै या कालावधीत एल निनो होण्याची शक्यता सुमारे 40 टक्क्यांपर्यंत वाढू शकते, असेही या अद्ययावत माहितीत नमूद करण्यात आले आहे.

























































