
आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मतदारांना आमिष दाखवण्याचे प्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोग अलर्ट झाला असून मतदानादरम्यान पैसे घेऊन फिरताना आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. गैरव्यवहारांना आळा घालणे हा उद्देशदेखील या निर्णयामागे असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
राज्यात मुंबई महानगरपालिकेसह 29 पालिकांच्या निवडणुका 15 जानेवारी रोजी होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे मतदानादरम्यान कोणताही गैरव्यवहार होऊ नये यासाठी आयोग कठोर उपाययोजना करीत आहे. निवडणूक काळात वाहनांमध्ये आढळणारा बेकायदेशी पैसा आयोगाकडून जप्त केला जातो. शिवाय निवडणूक काळात रोख, दारू, दागिने, ड्रग्ज आणि भेटवस्तूंचे वाटपही केले जाते. याच हालचालींवर कडक नजर ठेवण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. यासाठी आयोगाने पालिका, पोलीस, रेल्वे, विमानतळ, प्राप्तीकर विभाग आणि इतर यंत्रणांना सूचना जारी केल्या आहेत. गैरप्रकार रोखण्यासाठी प्रत्येक जिह्यात स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम्स आणि फ्लाइंग स्कॉड निरीक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.
भरारी पथकाची सज्जता
फ्लाइंग स्क्वॉडमध्ये प्रमुख म्हणून एक वरिष्ठ कार्यकारी दंडाधिकारी, एक वरिष्ठ पोलीस अधिकारी, एक व्हिडीओग्राफर आणि चार सशस्त्र पोलीस कर्मचारी असतात. निवडणूक आयोगानुसार, या पथकांना वाहन, एक मोबाईल फोन, एक व्हिडीओ कॅमेरा आणि रोख किंवा वस्तू जप्त करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे दिली जातात.































































