
सर्वांचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालसह आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी येथील विधानसभा निवडणुकांची घोषणा आज निवडणूक आयोगाने केली. पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांत 23 आणि 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तामिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात 23 एप्रिल रोजी आणि आसाम, केरळ व पुद्दुचेरी येथे 9 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
‘एसआयआर’नंतर तामिळनाडूत सर्वाधिक 74 लाख, तर पश्चिम बंगालमध्ये 58 लाख मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. याचा निकालावर काय परिणाम होतो, याकडे लक्ष असेल. पाच विधानसभांच्या मिळून 824 जागा असून 17.4 कोटी मतदार आहेत. निवडणूक आयोगाने बारामती आणि राहुरीसह गुजरातमधील उमरेठ, कर्नाटकमधील दवणगेरे दक्षिण आणि बागलकोट, गोव्यातील पोंडा, नागालँडमधील कोरीडांग आणि त्रिपुरातील धर्मानगर या ठिकाणीदेखील पोटनिवडणूक जाहीर केली आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमधील जागांसाठी 23 एप्रिलला, तर गोवा, कर्नाटक, त्रिपुरा आणि नागालँडमधील जागांसाठी 9 एप्रिलला मतदान होणार आहे.
आसाममध्ये भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसची आघाडी
आसाममध्ये भाजप गेल्या 10 वर्षांपासून सत्तेत आहे. मुख्यमंत्री हिमता बिस्व सरमा यांना सत्तेची हॅट्ट्रिक करण्यापासून रोखण्यासाठी काँग्रेसने पंबर कसली असून 10 पक्षांसोबत आसाममध्ये आघाडी केली आहे.
तामीळनाडूत सत्तांतराची परंपरा मोडित निघणार का?
तामिळनाडूमध्ये दीर्घ काळापासून आलटूनपालटून सत्तांतर झालेले आहे. गेल्या वेळी ‘एआयएडीएमके’चा पराभव करून डीएमकेने सत्ता मिळवली. एम.के. स्टॅलीन हे मुख्यमंत्री झाले. सत्तेत राहिलेला पक्ष सलग दुसऱ्यांदा जिंकत नाही. मात्र ही परंपरा स्टॅलीन यंदा मोडणार का, याकडे सर्वांचे लक्ष असेल. त्याच वेळी केरळमध्ये डाव्या आघाडीचे वर्चस्व मोडून काढत सत्ता मिळवण्यावर काँग्रेसचा जोर असेल. केरळममध्ये भाजला आतापर्यंत एकही विधानसभा निवडणूक जिंकता आलेली नाही.
ममता बॅनर्जी सलग चौथ्यांदा होणार का मुख्यमंत्री?
पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि डाव्यांचे वर्चस्व मोडून काढत तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी या सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत. या वेळी निवडणूक जिंकल्यास त्या सलग चौथ्यांदा मुख्यमंत्री होतील. ही कामगिरी करणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरतील. तामिळनाडूमध्ये जयललिता या पाच वेळा मुख्यमंत्री होत्या. मात्र त्या वेगवेगळ्या कार्यकाळात पदावर होत्या.
4 मे रोजी निकाल
पाचही राज्ये आणि पोटनिवडणुकीची मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. या विधानसभांचा कार्यकाळ मे-जूनमध्ये संपणार आहे. गेल्या निवडणुकीमध्ये पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यांत मतदान झाले होते. या वेळी दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.
बारामती आणि राहुरीत 23 एप्रिलला पोटनिवडणूक
बारामती आणि राहुरी येथील पोटनिवडणुकांचीही घोषणा यावेळी करण्यात आली आहे. 23 एप्रिल रोजी या ठिकाणी मतदान होणार असून 4 मे रोजी मतमोजणी होईल. अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे बारामती येथील विधानसभेची जागा रिक्त झाली आहे तर शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे अहिल्यानगर जिह्यातील राहुरीची जागा रिक्त झाली होती.




























































