रायबकिना ऑस्ट्रेलियन ओपनची नवी राणी! ‘नंबर वन’ सबालेंकाला हरवून इतिहास घडवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तीन वर्षांची सल मनात ठेवून कोर्टवर उतरलेली एलिना रायबकिना अखेर जेतेपदाच्या सिंहासनावर बसण्यात यशस्वी ठरली.
कझाकिस्तानच्या या ताकदवान टेनिस स्टारने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकत थेट इतिहास रचला. अंतिम सामन्यात ‘नंबर वन’ बेलारूसच्या आर्यना सबालेंकाला ६-४, ४-६, ६-४ अशा थरारक लढतीत पराभूत करत रायबकिन हिने जुना हिशेब चुकता केला.

ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारी रायबकिना ही कझाकिस्तानची पहिली महिला खेळाडू ठरली, हे विशेष. २६ वर्षीय रायबकिनासाठी हा सामना केवळ फायनल नव्हता, तर तीन वर्षांपूर्वीच्या पराभवाचा थेट बदला होता. २०२३ मध्ये हाच किताब सबालेंकाने रायबकिन हिच्या हातातून हिसकावला होता. यावेळी मात्र रायबकिनाने कोर्टवर कोणतीही दया दाखवली नाही.

२ तास १६ मिनिटांचे महायुद्ध!

रॉड लेवर एरिनावर रंगलेल्या या अंतिम सामन्यात दोन्ही खेळाडूंनी एकमेकांवर जबरदस्त हल्ले चढवले. रायबकिन हिने पहिला सेट जिंकत आघाडी घेतली, पण सबालेंकाने दुसऱ्या सेटमध्ये जोरदार पलटवार केला. निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये रायबकिन हिने ताकद, संयम आणि अचूक फटकेबाजीच्या जोरावर सामना आपल्या बाजूने झुकवला आणि किताबावर शिक्कामोर्तब केलं. उपांत्य फेरीत रायबकिन हिने अमेरिकेच्या जेसिका पेगुलाला ६-३, ७-६ अशा सरळ सेटमध्ये
धूळ चारत फायनलचे तिकीट मिळवले होते.

पहिलाच ग्रँड स्लॅम; थेट शिखरावर!

ऑस्ट्रेलियन ओपन हा रायबकिन हिचा पहिलाच ग्रँड स्लॅम किताब आहे. या विजयासह महिला टेनिसमध्ये नवा ‘पॉवरहाऊस’ जन्माला आल्याचं स्पष्ट झालं आहे. सबालेंकाचा दबदबा मोडीत काढत रायबकिन हिने ‘आता नवं पर्व सुरू झालं आहे,’ असा जगाला स्पष्ट संदेश दिला.

जोकोविच-अल्काराज आज जेतेपदासाठी भिडणार

ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष एकेरीचा अंतिम सामना आता सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो आहे. उद्या (दि.१) २४ वेळचा ग्रँड स्लॅम विजेता नोवाक जोकोविच आणि वर्ल्ड ‘नंबर वन’ कार्लोस अल्काराज यांच्यात रॉड लेवर एरिनावर महासामना रंगणार आहे. जोकोविच ११व्यांदा फायनलमध्ये, तर अल्काराज पहिल्यांदाच लढणार आहे. अनुभव विरुद्ध आक्रमकतेचा हा अंतिम सामना टेनिसप्रेमींसाठी एक पर्वणीच ठरणार, एवढं नक्की.