मस्क मुलांसाठी आणणार बेबी ग्रोक अॅप; सुरक्षित आणि वयानुसार असणार कंटेंट

इलॉन  मस्क यांची कंपनी एक्सएआय आता मुलांसाठी सुरक्षित आणि वापरासाठी सोपे असे बेबी ग्रोक हे एआय अॅप बाजारात आणणार आहे. मस्क यांनी आज याबाबत घोषणा केली. हे अॅप केवळ मुलांसाठी डिझाइन करण्यात येणार असून यात वयानुसार क्युरेटेड कंटेंट असेल तसेच कोणतेही प्रौढ किंवा संवेदनशील मटेरियल ब्लॉक केले जाईल. अॅपमध्ये पालकांसाठीही पॅरेंटल लॉक म्हणजेच नियंत्रणे असतील. त्यामुळे हे अॅप वापर आणि सेटिंग्जचेही निरीक्षण करू शकणार आहे.

यापूर्वी एक्सएआयने त्यांच्या एआय चॅटबॉट ग्रोकमध्ये कम्पॅनियन्स नावाचे एक नवीन वैशिष्टय़ लॉँच केले. यात दोन ऑनिमेटेड पात्रांचा समावेश आहे. एक फ्लर्टी जपानी ऑनिम पात्र आणि एक रागीट लाल पांडा म्हणजेच बॅड रुडी हे पात्र असेल. हे दोघेही वापरकर्त्यांशी संवाद साधू शकतात. दरम्यान हे फीचर सध्या फक्त आयओएसवर उपलब्ध आहे. ते वापरण्यासाठी वापरकर्त्यांना अॅपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन ते चालू करावे लागेल.

ऑनिमेटेड पात्र साधणार संवाद

कँपेनियन्स हे ग्रोक एआयमधील नवीन ऑनिमेटेड पात्र आहेत. अॅनी ही एक मुलगी आहे जी वापरकर्त्यांशी अतिशय मृदू भाषेत संवाद साधते. दुसरीकडे बॅड रुडी हा एक रेड पांडा आहे. हे पात्र जरा रागाने संवाद साधते. दोन्ही पात्रे आवाजाच्या आदेशांना आणि प्रश्नांना प्रतिसाद देऊ शकते.  आणखी एक पात्र ग्रोक अॅपमध्ये आणणार आहेत.