‘बिग बॉस’ विजेता एल्विश यादवच्या घरावर गोळीबार, तीन हल्लेखोरांनी दोन डझन गोळ्या झाडल्या

प्रसिद्ध यूटय़ूबर आणि ‘बिग बॉस’ ओटीटी विजेता एल्विश यादवच्या गुरुग्राम येथील निवासस्थानी रविवारी सकाळी गोळीबार करण्यात आला. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी दोन डझन गोळ्या यादवच्या घरावर झाडल्या. या घटनेत पुणीही जखमी झाले नाही. हल्ल्याची जबाबदारी भाऊ गँगने घेतली आहे. या गँगचे नीरज फरीदपुरिया आणि भाऊ रिटोलिया या दोघांची पोस्ट वायरल होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबाराची घटना सकाळी 5.30 ते 6 वाजण्याच्या सुमारास घडली. दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी गोळीबार केला. जवळपास दोन डझन गोळ्या झाडल्याचे निशाण घरावर दिसून आले आहेत. गोळीबार झाला तेव्हा एल्विश यादव घरात उपस्थित नव्हता. तसेच जेव्हा गोळीबार झाला तेव्हा घरात फक्त केअरटेकर होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे ताब्यात घेतले आहेत.

कोण आहे एल्विश यादव  

एल्विश यादवने 2023 साली ‘बिग बॉस ओटीटी’ हा शो जिंकला होता. त्यापूर्वी तो यूटय़ूबर म्हणून प्रसिद्धीस आला होता. मागच्या वर्षी रेव्ह पार्टीत सापाच्या विषाचा वापर केल्याच्या आरोपाखाली नोएडा पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याला जामीन मंजूर झाला होता.