
अनंतनागनंतर आज किश्तवाडमध्ये हिंदुस्थानी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. किश्तवाड जिह्यातील जंगलात दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. शोधमोहिमेदरम्यान दोन्ही बाजूंनी काही काळ गोळीबार झाला. अधुनमधून लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमधील संघर्ष आणखी तीव्र होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, अनंतनागमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेल्या नागरिकाचा आज रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले होते.
लष्कर, निमलष्करी दल आणि पोलिस नौनट्टा, नागेनी पेयास आणि आसपासच्या परिसरात दहशतवाद्यांची शोधमोहीम राबवत आहेत. दहशतवाद्यांना टीपून ठार करण्यासाठी लष्कराचे जवान संपूर्ण परिसर पिंजून काढत आहेत. संपुर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. शनिवारी अनंतनागच्या कोकरनाग येथे दहशतवाद्यांच्या गोळीबारात हवालदार दीपक कुमार यादव आणि लांस नायक प्रवीण शर्मा शहीद झाले होते. 3 जवान आणि 2 नागरिकही जखमी झाले होते. यातील एका नागरिकाचा आज रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
चार दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी
जम्मू-कश्मीरच्या कठुआ पोलिसांनी 4 दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी केली आहेत. हे दहशतवादी शेवटचे कठुआ जिह्यातील मल्हार, बानी आणि सोजधरच्या ढोक येथे दिसले होते. या दहशतवाद्यांबद्दल माहिती देणायांना 5 लाख रुपये बक्षिसाची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान, डोडा-कठुआ येथे 24 दहशतवादी लपल्याची शक्यता लष्कराने वर्तवली आहे.
अनंतनागच्या कोकेरनाग पट्टय़ात अहलान गागरमांडू जंगलात 10 हजार फूट उंचीवर दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यानंतर शोधमोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याने धुमश्चक्री उडाली.