
रेल्वे प्रशासनाने विनातिकीट प्रवाशांना स्थानकांच्या ‘एंट्री पॉइंट’लाच रोखण्याची योजना विचारात घेतली आहे. मेट्रो रेल्वेप्रमाणेच मुंबई लोकलच्या स्थानकांत ‘अॅक्सेस कंट्रोल सिस्टम’ कार्यान्वित केली जाणार आहे. यासंदर्भात पश्चिम रेल्वेने 12 स्थानकांची यादी रेल्वे बोर्डाकडे पाठवली आहे. यात मुंबईतील वांद्रे टर्मिनस, बोरिवली आणि अंधेरी स्थानकांचा समावेश असणार आहे.
सद्यस्थितीत रेल्वे प्रवाशांकडे तिकीट नसले तरी रेल्वे स्थानकांत एण्ट्री मिळते. विनातिकीट प्रवासी लोकलमधूनही सहज प्रवास करतात. यातील काही मोजकेच प्रवासी टीसींच्या तावडीत सापडतात. याचा परिणाम रेल्वेच्या महसुलावर होत आहे. दंडात्मक कारवाई करूनही लोकल प्रवासात विनातिकीट प्रवाशांची संख्या कमी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर मेट्रो रेल्वेप्रमाणे लोकलच्या स्थानकांत ‘अॅक्सेस कंट्रोल सिस्टम’ कार्यान्वित करण्याची योजना रेल्वे प्रशासनाने विचारात घेतली आहे. यासंदर्भात पहिल्या टप्प्यातील 12 रेल्वे स्थानकांची यादी रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आली आहे. यात गुजरात डिव्हिजनमधील स्थानकांचा समावेश आहे. नियोजित योजनेनुसार प्रवाशांना मेट्रोप्रमाणेच तिकीट तपासणी, सुरक्षात्मक तपासणीला सामोरे जाण्याबरोबरच प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचण्यासाठी विशिष्ट मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.
योजनेचे फायदे
- रेल्वे स्थानक परिसर आणि लोकलमधील गर्दी नियंत्रणात राहील.
- तिकीटधारक प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येईल.
- डेकपर एकाच ठिकाणी तिकीट खरेदी, निरीक्षण आणि एण्ट्रीची सुविधा असेल.
- प्रायोगिक तत्त्वावर योजना यशस्वी झाल्यास इतर स्थानकांत योजना राबवणार.