
हिंदुस्थानच्या युवा बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने बॅडमिंटन आशिया अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकत इतिहास रचला. पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत त्याला द्वितीय मानांकित चीनच्या शी युकीकडून 21-8, 21-10 असा पराभव स्वीकारावा लागला, मात्र त्याच्या या कामगिरीने हिंदुस्थानी बॅडमिंटनला अभिमानाची नवी उंची मिळवून दिली. केवळ 20 वर्षांच्या आयुषने या स्पर्धेत रौप्यपदक पटकावणारा पहिला हिंदुस्थानी खेळाडू बनत सुवर्ण अक्षरांनी नाव कोरले. तब्बल 61 वर्षांनंतर पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठणारा तो पहिलाच हिंदुस्थानी ठरला. त्यामुळे सुवर्ण हुकले तरी त्याने पदक जिंकण्याचा इतिहास मात्र रचला.
अंतिम सामन्यात मात्र आयुषला अपेक्षित लय सापडली नाही. शी युकीने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत पहिल्या गेममध्ये एकतर्फी आघाडी घेतली आणि आयुषला सावरण्याची संधीच दिली नाही. दुसऱ्या गेममध्ये आयुषने 7-2 अशी दमदार आघाडी घेत पुनरागमनाची चिन्हे दाखवली, पण चिनी खेळाडूने क्षणात खेळाचा ताबा घेत 7-7 अशी बरोबरी साधत अखेर विजयावर शिक्कामोर्तब केले.
या स्पर्धेत आयुषचा प्रवास मात्र खऱ्या अर्थाने थक्क करणारा ठरला. जागतिक क्रमवारीतील अव्वल, तृतीय आणि सातव्या मानांकित खेळाडूंना पराभूत करत त्याने अंतिम फेरी गाठली आणि आपल्या क्षमतेची जोरदार छाप पाडली. सुवर्णपदक हुकले, तरी आयुषच्या या रूपेरी झंकाराने हिंदुस्थानच्या बॅडमिंटनला नवे स्वप्न, नवा आत्मविश्वास दिला आहे.


























































