1200 रुपये किलोची काजू कतली घेतली पण कैद्यांना मिळालीच नाही! IG जालिंदर सुपेकरांवर गंभीर आरोप

पुण्यातील कारागृहात कैद्यांसाठी 1200 रुपयांची काजू कतली ही मिठाई तुरुंग प्रशासनाने घेतली होती. पण ही मिठाई कैद्यांपर्यंत पोहोचलीच नाही. फक्त मिठाईच नव्हे तर तुरुंग प्रशासनाने कैद्यांसाठी पाच कोटी रुपयांचा फराळ विकत घेतला होता. हा फराळ त्यांना मिळालाच नाही. त्यामुळे राज्यातील कारागृहात कैद्यांच्या नावाखाली बड्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप होत आहे.

शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोशल मिडियावर पोस्ट लिहून पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप केले आहे. एका फराळाची यादी शेअर करत राजू शेट्टी म्हणाले की, दिवाळी फराळ म्हणून कैद्यांना अमिताभ गुप्ता व जालिंदर सुपेकर यांनी 1200 रूपये किलोची काजूकतली खायला घातली मात्र कैद्यांनी ती खाल्लीच नाही!

राज्यातील कारागृहात कैद्यांच्या नावाखाली बड्या अधिका-यांनी रेशन व कॅन्टीन साहित्य खरेदीमध्ये प्रचंड मोठा भ्रष्ट्राचार केला आहे. कारागृह विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी कैद्यांना दिवाळीमध्ये जे फराळाचे साहित्य दिले त्या फराळाच्या साहित्याचे दर हल्दीराम ,काका हलवाई व चितळे बंधू यांच्या दर पत्रकाप्रमाणे होते. प्रत्यक्षात कैद्यांना लोकल मार्केटमधील फराळ खरेदी करून देण्यात आला या दरामध्ये जवळपास 40 ते 60 टक्के तफावत होती.

मागच्या वर्षीच्या दिवाळीत राज्यामध्ये जवळपास 5 कोटी रूपयाची खरेदी करण्यात आली आहे. सदरची खरेदी करण्यासाठी कोणतीही निवीदा प्रक्रिया करण्यात आली नाही. सोबत फराळाचे साहित्य व त्याचे दरपत्रक टाकले आहे यावरून कारागृहात किती अनागोंदी कारभार चाललेला आहे हे लक्षात येईल असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

दरम्यान जालिंदर सुपेकर यांनी यावर स्पष्टीकरण दिले असून ‘कारागृहात रेशन व कॅन्टीन साहित्य खरेदीसह दिवाळी फराळ खरेदी प्रक्रिया शासन नियमानुसार राबविण्यात आली आहे. याबाबत आम्ही यापूर्वीच म्हणणे मांडले आहे. त्यामुळे तेही सर्व आरोप निरर्थक आहेत”, असे जालिंदर सुपेकर यांनी म्हटले आहे.