
दक्षिण हिंदुस्थानात नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या आहेत. तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि ओपीएस म्हणून ओळखले जाणारे एआयएडीएमकेचे बहिष्कृत नेते ओ. पनीरसेल्वम यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) वेगळे होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यासोबत मॉर्निंग वॉक केल्यानंतर काही तासांतच त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
पनीरसेल्वम यांनी पंतप्रधानांची भेटीसाठी वेळ मागितली होती. मात्र, त्यांन भेटीची परवानगी देण्यात आली नाही. या नकारानंतर, त्यांनी सर्व शिक्षा अभियान (एसएसए) निधी वितरित करण्यात झालेल्या विलंबाबद्दल सोशल मीडियावर केंद्र सरकारवर जाहीर टीका केली. या घडामोडीनंतर त्यांनी भाजपला धक्का देत एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. ही घोषणा माजी मंत्री आणि पनीरसेल्वम यांचे विश्वासू पनरुती एस रामचंद्रन यांनी केली. आम्ही एनडीएतून बाहेर पडत आहोत. 2026 च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी पनीरसेल्वम लवकरच राज्यव्यापी दौरा सुरू करेल. सध्या आमची कोणशीही युती नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एआयएडीएमकेमधील एकेकाळी प्रमुख व्यक्ती आणि एनडीएमध्ये भाजपचे सहयोगी असलेले पनीरसेल्वम यांनी एआयएडीएमकेमधील नेतृत्व संघर्षानंतर स्वतःचा गट स्थापन केला होता. एनडीएमधून बाहेर पडल्याने आता राज्यात 2026६ च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.