
केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी बांग्लादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांबाबत तसेच फरार उद्योगपती विजय माल्या यांना हिंदुस्थानात परत आणणे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत महत्त्वपूर्ण विधान केले. बांग्लादेशात घडणाऱ्या घटनांकडे सरकार सतत लक्ष ठेवून आहे आणि या प्रकरणांबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
बांग्लादेशात हिंदूंवर वारंवार होणाऱ्या घटनांविषयी बोलताना कीर्तिवर्धन सिंह म्हणाले की तेथील घडामोडी अत्यंत चिंताजनक आहेत. हिंदुस्थान सरकारने बांग्लादेशातील हिंदुस्थानी उच्चायुक्तालयाला या संदर्भात सातत्याने सूचना दिल्या असून या घटनांवर कारवाई होऊन त्याला प्रतिबंध घालणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सरकार सातत्याने परिस्थितीवर नजर ठेवून आहे आणि चिंता व्यक्त केली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
विजय माल्या आणि नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की यापूर्वी दहशतवाद्यांनाही हिंदुस्थानात आणण्यात यश आले आहे, त्यामुळे सर्वांना परत आणले जाईल आणि कोणालाही वाचवले जाणार नाही. विजय माल्याविरुद्ध निश्चितच कारवाई होईल, काळजी करण्याची गरज नाही, असे त्यांनी सांगितले. देश सोडून पळालेल्यांविरुद्ध कठोर कारवाई होणार असून या संदर्भात हिंदुस्थानी उच्चायुक्तालयांमार्फत सातत्याने चर्चा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही मोठे दहशतवादीदेखील अलीकडे हिंदुस्थानात आणण्यात आले असल्याचे उदाहरण देत प्रत्येकाला परत आणले जाईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
सरकारचे उद्दिष्ट देशाला प्रत्येक क्षेत्रात पुढे नेण्याचे असल्याचे सांगून कीर्तिवर्धन सिंह म्हणाले की राष्ट्रीय सुरक्षा असो किंवा खेळांचे क्षेत्र, सरकार ठामपणे काम करत आहे. जे लोक देश सोडून पळाले ते त्यांच्या विरोधात कारवाई सुरू झाल्यामुळेच पळाले, असे त्यांनी सांगितले आणि कायद्याच्या चौकटीत राहून सरकारची कठोर भूमिका पुढेही कायम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.


























































