2400 कुटुंबीयांच्या डोक्यावर अतिधोकादायक छप्पर, जीवितहानी टाळण्यासाठी म्हाडा 96 उपकरप्राप्त इमारती सक्तीने रिकाम्या करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने गेल्या वर्षी सर्वेक्षण करून 96 अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली होती. मात्र अनेक वर्षे उलटून गेले तरी या इमारतीमधील 2400 कुटुंबीय अजूनही त्याच इमारतीत वास्तव्यास असून त्यांच्या डोक्यावर अतिधोकादायक छप्पर असल्याचे समोर आले आहे. वारंवार नोटीस देऊनही रहिवासी घर रिक्त करत नसल्यामुळे जीवितहानी टाळण्यासाठी म्हाडाने या अतिधोकादायक इमारती आता सक्तीने रिकाम्या करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तत्पूर्वी रहिवाशांना पुन्हा एकदा नोटिसा पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे रहिवासी आता काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

मुंबईत सध्या 13 हजारहून अधिक उपकरप्राप्त इमारती असून त्या 80 ते 100 वर्षे जुन्या आहेत. पावसाळय़ात या इमारती कोसळून जीवित किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी दरवर्षी पावसाळय़ापूर्वी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडूनतर्फे सर्वेक्षण करून धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. गेल्या वर्षी पावसाळापूर्व सर्वेक्षणात म्हाडाने 96 इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित केल्या होत्या. म्हाडाने रहिवाशांना दरमहा 20 हजार रुपये भाडय़ाचा पर्याय देऊन घरे रिकामी करण्यास सांगितले होते. संबंधित रहिवाशांनी म्हाडाच्या वॉर्ड कार्यालयात घराचे पुरावे सादर करावेत, असे आवाहन म्हाडाने केले होते. मात्र रहिवासी अजूनही त्यांच्या अतिधोकादायक असलेल्या इमारतीमधील घरातच वास्तव्यास आहेत.

रहिवासी म्हणतायत, भाडे अपुरे…

अतिधोकादायक इमारतीमधील रहिवाशांना भाडय़ाचा पर्याय देऊन इमारती रिक्त करण्यासाठी नोटिसा बजावल्या होत्या. परंतु एकाही रहिवाशाने अद्याप घर रिकामे केलेले नाही. 20 हजार रुपयांत आम्हाला त्याच परिसरात घर भाडय़ाने मिळत नाहीत, अशी रहिवाशांची तक्रार असल्याने ते म्हाडाला सहकार्य करत नाहीत, अशी माहिती म्हाडाच्या एका अधिकाऱयाने दिली. त्यामुळे जीवितहानी टाळण्यासाठी म्हाडा आता सक्तीने या अतिधोकादायक इमारती रिक्त करणार असल्याचेही अधिकाऱयाने सांगितले.

‘आयओएस सागर’ युद्धनौकेचे जलावतरण

‘आयओएस सागर’ या युद्धनौकेचे गुरुवारी नेव्हल डॉकयार्ड येथे जलावतरण करण्यात आले. पेंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी आंतरराष्ट्रीय सागरी संकेत ध्वज दाखवून जलावतरण केले. या सोहळ्याला नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी यांच्यासह नौदलातील जवान मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
z छाया ः संदीप पागडे