हिंदुस्थानात मिळतेय बनावट रेबीज लस, वर्षभरात 20 हजार लोकांचा मृत्यू; ऑस्ट्रेलियाचा इशारा

जागतिक आरोग्य संघटनेनुसार हिंदुस्थानात दरवर्षी 20 हजार लोक रेबीजने दगावतात. हिंदुस्थानात वापरल्या जाणाऱ्या या रेबीजच्या लस बनावट असून या लस रेबीज रोगासाठी फायदेशीर नसल्याचे ऑस्ट्रेलियाचे म्हणणे आहे. ऑस्ट्रेलियामध्ये लसीकरणासाठी काम करणारी सरकारी संस्था, ऑस्ट्रेलियन टेक्निकल अ‍ॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनने याबाबत इशारा दिला आहे. नोव्हेंबर 2023 पासून ही बनावट लस पुरवली जात असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे.

ऑस्ट्रेलियन टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनने म्हटले आहे की, अभयरॅब ब्रॅण्डची लस बनावट असून रेबीज रोगासाठी ती फायदेशीर नाही. या लसीमध्ये सक्रिय घटक योग्य प्रमाणात नाहीत. त्यामुळे अभयरॅब या रेबीज लसीचा वापर ऑस्ट्रेलियामध्ये होत नाही. अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, अभयरॅबच्या लसीला नागरिकांनी अवैध मानावे व त्याऐवजी रबीपूर किंवा वेरोरॅबसारख्या नोंदणीकृत लसींचा वापर करावा. ऑस्ट्रेलियन सल्लागाराने रेबीज लसीकरणाचा संपूर्ण रेकॉर्ड ठेवण्यावर भर दिला आहे. एखाद्या व्यक्तीला नोव्हेंबर 2023 नंतर अभयरॅब लस दिली गेली असेल किंवा वापरलेल्या लसीचा ब्रॅण्ड स्पष्ट नसेल तर एटीएजीआयशी सल्लामसलत करावा.