
कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. मात्र, कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. शेतकऱ्यांना इतर पिकांपेक्षा रब्बी हंगामात कांद्यातून चार पैसे मिळतील, अशी अपेक्षा होती.
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील शुल्क हटविल्यानंतर कांद्याचे बाजारभाव वाढतील, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली असून, कांद्याला 10 ते 13 रुपये किलोप्रमाणे भाव मिळत असल्याने उत्पादन खर्चदेखील निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
सध्या बाजार समितीत कांद्याला 1 हजार ते 1 हजार 300 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्च काढणेही कठीण झाले आहे. कांद्याची प्रत उत्तम असली, तरी दर घसरल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. गेल्या दीड महिन्यापासून कांद्याचे दर स्थिर आहेत. बाजारभाव कमी असल्याने कांदा उत्पादकांचा पुरता वांदा केल्याने कांदा चाळीत साठविण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. कांदा उत्पादनात वाढ झाली असली तरी सध्या भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
जाणकारांच्या म्हणणाऱ्यानुसार दोन ते तीन महिने भाव स्थिर राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची द्विधा मनःस्थिती झाली आहे. भर उन्हाळ्यात कांदा काटणीला मजूर मिळत नाही. त्यातच उन्हाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर असताना देखील शेतकरी कांदा काढणी करीत आहेत.