दोनदा पेरण्या करूनही हजारोंची बियाणे वाया, यंदा पावसाने शेतकऱयांच्या डोळ्यांत आणले ‘पाणी’

farmers-loss-double-sowing-rain-fails-crop

यंदा पावसाने सुरुवातीपासूनच शेतकऱयांच्या शेतीचे गणितच बिघडवून टाकले आहे. त्यामुळे गडहिंग्लज तालुक्यात बऱयाच ठिकाणी शेतकऱयांनी दोनवेळा पेरण्या करूनही त्या वाया गेल्याचे चित्र आहे. बियाणांसाठी हजारो रुपये खर्च करूनदेखील पावसामुळे हाती काहीच न लागण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱयांच्या डोळ्यांत पावसाने पाणी आणले आहे. त्यामुळे यावर्षी सोयाबीन, भात, भुईमूग या पिकांचे उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मे महिन्यातील ऐन उन्हाळ्यात पाऊस बरसल्याने शेतकऱयांना शेत तयार करणे व मशागतीसाठी पुरेसा वेळच मिळाला नाही. पाऊस आता थांबेल, नंतर थांबेल, या आशेवर शेतकऱयांनी प्रतीक्षा केली. मात्र, पावसाने जोरदार झोडपून काढल्याने शेतामध्येही चिखल झाला. अशा परिस्थितीत मशागत व पेरणी करायची कशी? हा प्रश्न शेतकऱयांना पडला होता.

गडहिंग्लज तालुक्यातील मासेवाडी, मुंगुरवाडी, जांभूळवाडी, सावतवाडी, लाकूडवाडी, बटकणंगले, महागाव परिसरातील शेतकऱयांनी भात, सोयाबीन, भुईमूग बियाणांची दुबार पेरणी करूनही अतिपावसामुळे ती वाया गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे हजारो रुपयांची बियाणे पाण्यात गेली आहेत. या परिसरात सोयाबीनच्या जमिनी तर ओस पडल्यासारख्या आहेत. भुईमुगाची उगवण झाली असली, तरी अतिपावसामुळे पीक वर आल्याने मोर व लांडोरसारख्या पक्ष्यांनी उपसून टाकल्याने तेही हातचे गेले आहे. भातपिकाच्यादेखील दोन-दोन पेरण्या केल्या आहेत, तरीदेखील हाती काहीच लागलेले नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाने शेतकऱयांचे गणितच कोलमडून टाकले आहे.

यंदा पावसाने शेतकऱयांना मोठा फटका दिला आहे. भात, सोयाबीन, भुईमूग बियाणांची दोन वेळा पेरणी करूनही ती वाया गेली आहे. त्यामुळे शेतीवरच उदरनिर्वाह असणाऱया शेतकऱयांना भविष्याची चिंता लागली आहे.

– बबन कुपेकर, शेतकरी, मासेवाडी