>> प्रसाद नायगावकर
टिपेश्वर अभयारण्यात पर्यटकांना हमखास करून वाघाचे नियमित दर्शन होत असते . त्यामुळे व्याघ्र प्रेमींसाठी टिपेश्वर अभयारण्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे . यात भर पाडली आर्ची आणि तिचे नटखट तीन बछडे यांची. नुकतेच उन्हाच्या त्रासामुळे आर्ची आणि तिचे तीन बछडे बराच काळ थंडगार पाण्याचा आनंद घेताना आणि खेळताना दिसले . आणि विशेष म्हणजे एखाद्या कसलेल्या अभिनेत्रीप्रमाणे छायाचित्रकारांना सुंदर पोसेसही देते . याचा पर्यटक मनमुरादपणे आनंदही लुटताना दिसले .
यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यात हमखास वाघाचे सतत दर्शन होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांचा ओढा या अभयारण्यात वाढताना दिसला आहे .त्यामुळे हे अभयारण्य पर्यटकांमुळे हाऊसफूल झाले आहे .
टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्र राज्यामधील यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तहसील अंतर्गत विखुरलेले आहे.हिरव्यागार वनराई मध्ये जवळपास १४८.६३ चौ.कि.मी. मध्ये अभयारण्य व्यापलेले आहे. उंच डोंगराळ व द-या खोऱ्यांचा भाग असल्या कारणांमुळे याठिकाणी विविध जातीच्या वनस्पती आढळून येतात.तसेच घनदाट जंगल क्षेत्र असल्या कारणांनी वेगवेगळे जंगली पशु पक्षी यांचा नेहमी वास असतो. वाघ, चितळ, सांबर, काळवीट, कोल्हा, अस्वल, मोर, माकड, नीलगाय, जंगली मांजर ई. प्रकारचे प्राणी या अभयारण्यात आढळून येतात.टिपेश्वर अभयारण्यात प्रामुख्याने साग या जातीची झाडे मोठ्या प्रमाणात आहे. तसेच निम, भुईनिम, बेल, बेहाळा, चंदन, पळस, खैर, धावडा, सालई, बाबुळ, आंजन, इत्यादी प्रकारच्या वृक्षांसह मोठ्या प्रमाणावर औषधी वनस्पतीही मुबलक प्रमाणात आहे.
गेल्या काही दिवसात वाघांची संख्या वाढल्याने अभयारण्याला विशेष महत्त्व आले आहे.तज्ञांच्या मते या अभयारण्यात किमान २२ वाघांचे अस्तित्व आहे . वाघांच्या मानाने हे क्षेत्रफळ कमी पडत असल्याने पर्यटकांना त्यामुळे हमखास व्याघ्रदर्शन नियमित होते . जर तुम्ही निसर्गप्रेमी आहात तर टिपेश्वर अभयारण्याला जरूर भेट द्या.