मंगलमय वातावरणात गणपती बाप्पांचे आगमन, कोकणातील घरं गजबजली

गणपती बाप्पा मोरया…एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार… असा जयघोष करत ढोल-ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत आज गणपती बाप्पांचे आगमन झाले. रत्नागिरी जिल्ह्यात १ लाख ६९ हजार ४२६ गणेशमूर्तींची घरोघरी प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. १२६ ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवात प्रचंड उत्साहात गुलाल उधळत बाप्पांचे मिरवणुकीने आगमन झाले. त्यानंतर प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणणारा हा गणेशोत्सव कोकणात धूमधडाक्यात साजरा होत आहे. कोकणात वर्षभर बंद, रिकामी असलेली घरे सजली आणि गजबजली आहेत.

घरच्या गणपतीसाठी चाकरमानी मोठ्या संख्येने गावी आले आहेत. गेले काही दिवस घराघरात मखर आणि सजावटींची जोरात तयारी सुरु होती. आज वाजत-गाजत गणपती बाप्पांचे आगमन झाले. पूजाअर्चा, आरती करत सर्वजण बाप्पाच्या सेवेत तल्लीन झाले. मंगलमय वातावरणात आज गणपती बाप्पांचे आगमन झाले. रत्नागिरी शहरातून पारंपरिक कर्ला-आंबेशेतची मिरवणूक निघाली. गणपती आगमना प्रसंगी जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.