भांडणात बेभान झाला; मित्राच्या कानाचा चावा घेतला

भांडणात बेभान होऊन माथेफिरू तरुणाने मित्राच्या कानाचा लचका तोडल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या हल्ल्यात श्रवण लिखा याच्या कानाला गंभीर दुखापत झाली आहे. श्रवण आजारी मैत्रिणीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. त्यावेळी श्रवणचा मित्र विकास मेनन यालादेखील बोलावले होते. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला आणि संतापलेल्या विकासने त्याच्यावर हल्ला करत कानाचा चावा घेतला.

श्रवणची पातलीपाडा येथील हिरानंदानी इस्टेट येथे राहणारी मैत्रीण रिदिमा हिचे काही दिवसांपूर्वी ऑपरेशन झाल्याने तिने त्याला मेसेज करून घरी भेटण्यासाठी बोलावले. बुधवारी रात्री १० वाजता श्रवण तिला भेटण्यासाठी घरी गेला. यावेळी रिदिमा हिच्या इमारतीत राहणारा श्रवणचा मित्र विकासने श्रवणला त्याच्या घरी येण्यास सांगितले. श्रवणने त्याला नकार देत रिदिमाच्या घरी बोलावले. दरम्यान झालेल्या भांडणात विकासने श्रवणच्या डाव्या कानाच्या पाळीचा चावा घेतला.