
दिंडोशी विधानसभेतील दादासाहेब फाळके चित्रनगरीजवळ असलेल्या शिवशाही वसाहतीमधील रहिवाशांबरोबर उद्धट आणि मुजोरपणे वागणाऱ्या तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शिवसेना नेते सुनील प्रभू यांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांच्याबरोबर हुज्जत घालून अरेरावी करणाऱ्या दादासाहेब फाळके चित्रनगरीतील मुजोर मुख्य सुरक्षा अधिकारी अनिल माने याला अखेर नोकरीतून बडतर्फ करण्याचा निर्णय चित्रनगरी प्रशासनाने घेतला. अनिल माने हा निवृत्त उच्चस्तरीय सरकारी अधिकारी असून तो कंत्राटी पद्धतीने चित्रनगरीत कामाला होता. मुंबई उपनगर जिह्याचे पालकमंत्री आशीष शेलार यांनी अशा पद्धतीची मुजोरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा प्रशासनाला देत माने याला 24 तासांत बडतर्फ करण्याचे आदेश दिले.
शिवशाही वसाहतीत बांधण्यात येणाऱ्या सभामंडपाचा शुभारंभ करण्याकरिता गेल्या आठवडय़ात शिवसेना नेते, आमदार सुनील प्रभू गेले असता स्थानिकांसोबत इतर समस्यांची पाहणी केली. यावेळी स्थानिकांनी मुख्य सुरक्षा अधिकारी अनिल माने हे रहिवाशांबरोबर उद्धट आणि मुजोरपणे वागत असल्याची तक्रार केली. यावेळी काम सुरू असलेल्या ठिकाणी सुनील प्रभू गेले आणि त्यांनी माने याची भेट घेऊन चित्रनगरीच्या सहव्यवस्थापकीय संचालक व व्यवस्थापकीय संचालक यांच्यासोबत झालेल्या संभाषणाची माहिती दिली. मात्र, माने याने मुजोरी करत, हुज्जत घालत, अरेरावी केली. त्यामुळे संतापलेल्या रहिवाशांनी जेसीबीवर चढून काम बंद पाडले. यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता, मात्र प्रभू यांनी परिस्थिती सामंजस्याने हाताळली. दरम्यान, जनभावनेचा आदर करणे, लोकप्रतिनिधींच्या अधिकारांचे संरक्षण करणे हे प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याचे कर्तव्य असून अनिल मानेवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना नेते अनिल परब, सुनील प्रभू यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. त्याला सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी पाठिंबा दिला. त्यानंतर पालकमंत्री आशीष शेलार यांनी कारवाई केली.
रहिवाशांमधील भीती दूर करण्यासाठी संयुक्त बैठक
शिवशाही पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेली शिवशाही वसाहत आहे. विकास नियोजन रस्त्याचे व संरक्षण भिंतींचे काम चित्रनगरीच्या हद्दीत सुरू असून त्यामुळे येण्या-जाण्याचा रस्ता बंद होईल, अशी भीती वसाहतीच्या रहिवाशांमध्ये निर्माण झाली व रहिवाशांनी आंदोलन केले. मात्र, सुनील प्रभू यांनी चित्रनगरीच्या सह-व्यवस्थापकीय संचालक व व्यवस्थापकीय संचालक यांच्यासोबत बोलून स्थानिकांसमवेत संयुक्त बैठक घेऊन रहिवाशांच्या मनातील भीती दूर करण्याची मागणी केली. यावेळी संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन चित्रनगरी प्रशासनाने सुनील प्रभू यांना दिले.