
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर देशभरातून राजकीय नेते प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील यासंदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘ज्यांनी पहगाम हल्ला घडवला ते अतिरेकी अजून सापडलेले नाहीत, कोम्बिंग ऑपरेशन करून त्यांना हडकून काढले पाहिजे. देशाचे प्रश्न वेगळे आणि गंभीर आहेत हे एअर स्ट्राइक, मॉकड्रिल, युद्ध वैगरे त्यावरचं उत्तर नाही’, अशी ठाम भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.
पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले की, ‘पहलगामचा हल्ला झाल्यानंतर मी पहिलं ट्विट केलं होतं की ज्यांनी हल्ला केला त्यांना धडा शिकवला पाहिजे, कठोर असा धडा शिकवला पाहिजे की त्यांच्या पिढ्यांना लक्षात राहिला पाहिजे’.
पुढे बोलताना, ‘दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं. युद्ध हे उत्तर नसतं. जसं अमेरिकेत ट्वीन टॉवर पाडले म्हणून त्यांनी युद्ध नाही केलं, त्यांनी अतिरेकी ठार मारले. हे दोन्ही देशात युद्ध परिस्थिती आणायची आणि आता मॉकड्रिल करायचं, सायरन वाजवणं वैगरे…हे काही यावर उत्तर नाही’, असंही राज ठाकरे म्हणाले.
अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचं!
‘मुळात ही गोष्ट का घडली हे पण आपण लक्षात घेण्यासारखं आहे. मला असं वाटतं की थोडं अंतर्मुख होऊन आपण आपला विचार करणं गरजेचं आहे. पाकिस्तान अगोदरच बरबाद झालेला देश आहे. त्याला आणखी काय बरबाद करणार तुम्ही? प्रश्न असा आहे की ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला ते अतिरेकी तुम्हाला सापडलेले नाहीत. हजारो पर्यटक जिथे इतकी वर्ष जातात तिथे सुरक्षा का नव्हती? हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. आपल्या देशात कोंबिंग ऑपरेशन करून त्यांना शोधून काढणं गरजेचं आहे. एअर स्ट्राइक करून वेगळ्या ठिकाणी भरकटवून, युद्ध वैगरे त्याचं उत्तर होऊ शकत नाही, असं त्यांनी सांगितलं.
सरकारच्या चुका दाखवल्याच पाहिजेत!
सरकारच्या चुका दाखवल्याच पाहिजेत, असं म्हणत राज ठाकरे यांनी काही मुद्द्यांवर जोर दिला. ‘ज्यावेळेला हा प्रकार घडला त्यावेळी पंतप्रधान हे सौदीचा दौरा सोडून आले आणि नंतर बिहारमध्ये प्रचाराला गेले मला असं वाटतं हे करण्याची गरज नव्हती. केरळात जाऊन अदानीचं पोर्ट उद्घाटन केलं, इकडे फिल्म इंडस्ट्रीसाठी WAVE चा कार्यक्रम केला. मग इतकी जर गंभीर गोष्ट आहे तर या गोष्टी टाळता आल्या असत्या. मग इकडे येऊन मॉकड्रिल, एअर स्ट्राइक करायचा… हे काही त्यावरचं उत्तर नाही, असं त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं. ज्यांनी हा हल्ला केला आहे त्यांना हडकून काढणं, त्यांचा बंदोबस्त करणं, संपूर्ण देशभर मॉकड्रिल करण्यापेक्षा जिकडे माहित आहे तिथे कोम्बिंग ऑपरेशन करा, असं राज ठाकरे म्हणाले.
कुठे काय सुरू आहे मुंबई पोलिसांना सगळ्या गोष्टी माहित आहे. आज आपल्या देशात प्रश्न आहेत आणि आपण यु्द्धाला सामोरे जात आहोत मला असं वाटतं हे काही योग्य नाही, असंही त्यांनी ठाम शब्दात सांगितलं.