
दिवाळीच्या गेल्या ३ दिवसांत तब्बल १५ ठिकाणी आगडोंब उसळला असल्याच्या घटना ठाणे शहरात घडल्या आहेत. फटाक्यांमुळे आगी लागल्या असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे. दरम्यान सोमवारी पाच, मंगळवारी चार तर बुधवारी सहा ठिकाणी आग लागल्याची माहिती आपत्ती विभागाने दिली.
ऐन दिवाळीत नवी मुंबईत आगीच्या दोन घटनेत सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. असे असताना ठाण्यातदेखील वेगवेगळ्या ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. कळवा, मुंब्रा, हिरानंदानी इस्टेट, वागळे इस्टेट, वर्तकनगर, खोपट अशा विविध ठिकाणी आगीच्या घटना घडलेल्या आहेत. यात कळवा येथील विटावा परिसरात असलेल्या स्मशानभूमी बाजूला असलेल्या कचऱ्याला आग लागली होती. तसेच वागळे इस्टेट येथील गॅरेजला आग लागली होती. मुंब्रा येथील मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला आग आली होती. हिरानंदानी इस्टेट येथील ३१ व्या मजल्याच्या एका घरातील सोफा व लाकडी साहित्याला आग लागली होती. वर्तकनगर दुसऱ्या मजल्यावर असलेल्या सदनिकेमधील वॉशिंग मशीनला आग लागली होती. तर खोपट येथे एका दुकानाच्या छतावरील प्लास्टिक ताडपत्रीला आग लागली. दरम्यान सुदैवाने आपत्ती विभागाने तत्काळ धाव घेतल्याने ठाण्यातील कोणत्याही घटनेत जीवितहानी झाली नसल्याने अनर्थ टळला आहे.
७२ तासांत आपत्ती कक्षाला २८ फोन
दिवाळीच्या काळात ठाणे पालिकेच्या आपत्ती विभागात आग लागल्याचे एकामागून एक कॉल आल्याने कर्मचाऱ्यांची झोप उडाली होती. गेल्या ७२ तासांत आपत्ती कक्षात विविध तक्रारींचे २८ फोन खणखणले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यामध्ये सर्वात जास्त तक्रारी आग लागल्याच्या होत्या अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी यांनी दिली.



























































