होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून शिवालिक जहाज मुंद्रा बंदरात दाखल; पहिले मालवाहू जहाज परतल्याने दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपूर्ण आखाती देशांमध्ये तणावाचे वातावरण असताना हिंदुस्थानासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या आणि युद्धाच्या छायेखाली अत्यंत संवेदनशील मानली जाणारी ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ पार करून पहिले हिंदुस्थानी मालवाहू जहाज 45 हजार मेट्रिक टन गॅस घेऊन यशस्वीरीत्या हिंदुस्थानात परतले आहे. ‘शिवालिक’ नावाचे हे एलपीजी कॅरियर जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरात सुखरूप दाखल झाले असून, यामुळे हिंदुस्थानच्या ऊर्जा सुरक्षा आणि सागरी व्यापाराच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळाला आहे.

इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझची सामुद्रधुनी हे जागतिक व्यापारासाठी सर्वात धोकादायक ठिकाण बनले आहे. जगातील एकूण कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा मोठा हिस्सा याच मार्गाने वाहून नेला जातो. या भागात जहाजांवर होणारे हल्ले आणि जप्तीची भीती असतानाही, हिंदुस्थानी नौदलाच्या कडक सुरक्षेखाली आणि आंतरराष्ट्रीय समन्वयाने ‘शिवालिक’ने हा टप्पा यशस्वीपणे पार केला.

हिंदुस्थानासाठी एलपीजी आणि कच्च्या तेलाचा पुरवठा विनाअडथळा सुरू राहणे अत्यंत आवश्यक आहे. ‘शिवालिक’ मुंद्रा बंदरात पोहोचणे हे हिंदुस्थानी नौदलाच्या सागरी सुरक्षेतील वाढत्या प्रभावाचे प्रतीक मानले जात आहे.  गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बंदरात हे जहाज पोहोचल्यानंतर प्रशासनाकडून सर्व सुरक्षा आणि तांत्रिक तपासणी पूर्ण करण्यात आली. या जहाजाद्वारे मोठ्या प्रमाणात एलपीजीचा पुरवठा करण्यात आला असून, यामुळे देशांतर्गत इंधन पुरवठ्याला बळकटी मिळणार आहे.