
लोणावळा शहरात पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचे सर्वाधिक आकर्षण असलेले भुशी धरण ओव्हरफ्लो झाले असतानाच धरणाच्या पाण्यात एकाच कुटुंबातील पाचजण बुडाल्याची घटना घडली आहे.
शाहिस्ता लियाकत अन्सारी (37), अमिना सलमान ऊर्फ आदिल अन्सारी (13, रा. सय्यदनगर, हडपसर) आणि उमेरा सलमान ऊर्फ आदिल अन्सारी (8) या तिघींचे मृतदेह बचाव पथकाला सापडले, तर मारिया अकिल अन्सारी (9), अदनान सबाहत अन्सारी (4) या दोघांचा शोध सुरू आहे.
‘भुशी डॅमच्या पाठीमागील डोंगरावरून वाहणारा धबधबा आणि त्याचा प्रवाह धोकादायक आहे. तिथे ‘प्रवेश बंद’चे फलकही लावले आहेत. तरीही पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करतात. पोलिसांकडे संख्याबळ कमी असल्याने प्रत्येक ठिकाणी आम्ही लक्ष देऊ शकत नाही’, असे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक म्हणाले.