
शेतात खेळत असताना आईसमोरच पाच वर्षांचा मुलगा बोअरवेलसाठी खोदलेल्या 150 फूट खड्ड्यात पडल्याची घटना राजस्थानमध्ये घडली. घटनेची माहिती मिळताच एनडीआएफ आणि एसडीआरएफची टीमसह स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बोअरवेलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. चिमुकल्याच्या बचावासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
दौसा जिल्ह्यातील नांगल राजावतान पोलीस ठाण्याअंतर्गत कालीखंड गावात ही घटना घडली. आर्यन असे या चिमुकल्याचे नाव आहे. आर्यन बोअरवेलमध्ये पडल्याची माहिती मिळताच गावात एकच खळबळ माजली आहे.
आर्यनला वाचवण्यासाठी बोअरवेलजवळ बोगदा खोदण्याचे काम सुरू आहे. खड्डा खोदण्यासाठी सहा जेसीबी आणि सहा ट्रॅक्टर घटनास्थळी मागवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 15 फूट खोदकाम झाले आहे. सदर बोअरवेलचा खड्डा तीन वर्षांपूर्वी खोदण्यात आला होता. मात्र नंतर तो तसाच ठेवण्यात आला. मालकाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडली.