कोल्हापुरात पुरसदृशस्थिती; नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याच्या हालचाली

जिह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून, शहरासह सर्वत्र पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. आजही दिवसभर संततधार पाऊस सुरूच होता. सायंकाळी काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे सकाळपासून दुपारपर्यंत 37 फुटांवर स्थिरावलेल्या पंचगंगा नदीच्या पातळीत पुन्हा तासाला इंचाने वाढ होताना दिसत होती. 39 फूट इशारा पातळी असलेल्या पंचगंगेची पातळी सायंकाळी सहाच्या सुमारास 37.4 झाली होती. सायंकाळी वाढलेल्या पावसाचा जोर पाहाता मध्यरात्री पंचगंगा इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुराचे पाणी घुसणाऱया नागरी वस्तीतील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, पंचगंगा, वारणा, कृष्णा, भोगावती, वेदगंगा, दूधगंगा, घटप्रभा, कासारी आदी नद्यांचे पात्राबाहेर पडलेले पाणी आता नदीकाठच्या शेतात आणि नागरी वस्तीत घुसू लागले आहे. त्यामुळे पूरसदृशस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत 85 बंधारे पाण्याखाली गेले होते.

कोल्हापूर जिह्यात पुन्हा एकदा पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसभर पावसाचा जोर पाहाता, पंचगंगा आज रात्री उशिरापर्यंत इशारा पातळी गाठेल, असा अंदाज प्रशासनाकडून वर्तवण्यात येत आहे. यामुळे यंत्रणादेखील सतर्क झाली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या आढावा बैठकीत स्वयंसेवक आणि एनडीआरएफची पथके सज्ज ठेवण्यासह पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास व्यक्ती आणि जनावरांचे वेळेत स्थलांतर आणि कुटुंबीयांसाठी निवारा व्यवस्था तयार ठेवा, कोणत्याही परिस्थितीत जीवितहानी होणार नाही, याची दक्षता घ्या, अशा सूचना जिल्हाधिकाऱयांनी सर्व विभागाच्या प्रमुखांना दिल्या आहेत.

राधानगरी 80 टक्के भरले; अलमट्टीतून 65 हजारांनी विसर्ग

हवामान खात्याने पुढील दोन दिवस जिह्याला ‘यलो अलर्ट’ दिल्याने पावसाची संततधार सुरूच राहणार आहे. ग्रामीण भागात असलेल्या शाहूवाडी, गगनबावडा, आजरा, राधानगरीसह धरण क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात अतिवृष्टीसदृश पाऊस पडत आहे. राधानगरी धरण 80 टक्के भरले असून, धरणाच्या पॉवर हाउसमधून 1450 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. तसेच घटप्रभा 8434, वारणा 1592, कोदेमधून 936 घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, कर्नाटकातील अलमट्टी धरण 80 टक्के भरले असून, धरणातून सध्या 65 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग वाढविण्याबाबत महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पाटबंधारे विभागातील अधिकाऱयांकडून समन्वय साधण्यात येत आहे.

जिह्यात 24 तासांत 28.4 मि.मी.

कोल्हापूर जिह्यात गेल्या 24 तासांत एकूण 28.4 मि.मी. पाऊस झाला असून, शाहूवाडी तालुक्यात सर्वाधिक 58.4 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तसेच हातकणंगले 15.6, शिरोळ 7.1, पन्हाळा 29.1, राधानगरी 28.4, गगनबावडा 35.6, करवीर 21.8, कागल 24.7, गडहिंग्लज 25.6, भुदरगड 41.4, आजरा 42.2 आणि चंदगड तालुक्यात 36.2 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.