
लातूर जिल्ह्याला पावसाने जोरदार तडाखा दिला असून जनजीवन चांगलेच विस्कळीत झाले आहे. उदगीरच्या लेंडी या उप नदीला पूर आला असून पुराचे पाणी धडकनाळ बोरगाव गावात घुसले आहे.
उदगीचे तहसीलदार राम बोरगावकर हे ३ वाजेपासून घटनास्थळी ठाण मांडून बसले आहेत. नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला. जनावरांचे मोठ्या प्रमाणात जिवीत हानी होऊन नुकसान झाले आहे. लातूर जिल्ह्यातील काही मार्गावरील रस्ते वाहतूक बंद
लातूर जिल्ह्यातील नद्या भरभरून वाहात आहेत. पुलावरून पाणी वाहत असल्याने काही मार्गावरील रस्ते वाहतूक बंद करण्यात आली आहे.
नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे त्या मुळे काही मार्गावरील पुलावर पाणी आल्याने खालील मार्गावरील एस. टी.बस वाहतूक बंद आहेत.
उदगीर- देगलूर मार्गावरील करजखेल येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने उदगीर-देगलूर मार्गावरील वाहतूक बंद आहे. उदगीर ते हानेगाव मार्गे हंगरगा वरील सावरगाव ते हंगरगा मधील गळसुबाई तांडा येथील पुलावर पाणी असल्यामुळे उदगीर- हानेगाव मार्गे हंगरगा वाहतूक बंद झाली आहे. सदरची वाहने हानेगाव- एकंबा- मुर्की मार्गाने फिरवली आहेत. उदगीर- होकर्णा या मार्गावरील भवानी दापका येथील पूलावर पाणी असल्यामुळे उदगीर- होकर्णा, उदगीर- हानेगाव मार्गे बोंथी वाहतूक बंद झाली आहे. सदरचे वाहन खेर्डा, डोंगरगाव, एकंबा, मुर्की या मार्गे फिरविण्यात आले आहे. माणकेश्वर – उदगीर या मार्गावरील इंद्रराळ येथील पुलावरून पाणी वाहत आहे. सदरचा मार्ग बंद आहे. अहमदपूर-अंधोरी हा मार्ग पावसामुळे बंद आहे.