
मुंबईसह परिसरात थंडीची तीव्रता वाढली असून ठाणे जिह्यात धुके पडण्यास सुरुवात झाली आहे. या धुक्यामुळे मध्य रेल्वेची सेवा मंदावली आहे. बदलापूर, कर्जत, कसारा मार्गावर लोकलचा वेग निम्म्याने कमी झाला आहे. याचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतच्या (सीएसएमटी) संपूर्ण सेवेवर परिणाम होत आहे. त्यात सोमवारी बदलापूर-कर्जतदरम्यान सुरू असलेल्या कामामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली आणि प्रवाशांचे हाल झाले.
एरव्ही ताशी 105 किमीपर्यंत वेगाने धावणाऱ्या लोकल धुक्याच्या प्रभावाच्या कालावधीत कमाल ताशी 60 किमीपर्यंत चालवण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून दिल्या गेल्या आहेत. दाट धुक्याच्या साम्राज्यात कमी दृश्यमानतेमुळे सिग्नल स्पष्ट दिसत नाहीत. तसेच रुळावर काम करणारे कामगार, रुळ ओलांडणारे प्रवासी यांचा अंदाज येत नाहीय.
आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचा खोळंबा
सीएसएमटीकडे जाणारी लोकल सेवा पूर्णपणे कोलमडली. बहुतांश लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने धावल्या. आसनगाव, कसाराहून सुटणाऱ्या लोकल मागे ठेवून एक्स्प्रेस पुढे काढल्या जातात. त्यामुळे अशाप्रकारे वारंवार लोकल सेवा कोलमडते, अशी प्रतिक्रिया वासिंद येथील नियमित प्रवासी आकाश कोंडलेकर यांनी दिली. कर्जत, कसाराहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाडय़ांना दिवा, मुंब्य्रात थांबा न देण्याची मागणी जोर धरत आहे.




























































