विदेशी गुंतवणूकदारांची हिंदुस्थानातून पळापळ, नऊ दिवसांत 27 हजार कोटींचे शेअर्स विकले

विदेशी गुंतवणूकदार शेअर बाजारातून सतत पैसे काढत आहेत. त्यांनी मागील नऊ दिवसांत 27 हजार कोटींचे शेअर्स विकले आहेत. भीतीदायक गोष्ट म्हणजे, ऑगस्ट महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांचा लाँग टू शॉट रेशियो 0.11 पर्यंत खाली आला. मागील वर्षी हा रेशियो 0.6 टक्के होता. विदेशी गुंतवणूकदारांनी जेवढे सौदे केलेत त्यातील 90 टक्के शेअर विकले जाणारे आहेत.

विदेशी गुंतवणूकदारांनी हिंदुस्थानी बाजारातून पैसे काढण्याची अनेक कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे या कंपन्यांचा पहिल्या तिमाहीचा निकाल फारसा चांगला नाही. दुसरे कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानी वस्तूंवर 25 टक्के कर लावला आहे. तिसरे कारण म्हणजे अमेरिकेचा डॉलर मजबूत झाला आहे. यामुळे विदेशी गुंतवणूकदार घाबरले असून हिंदुस्थानी शेअर विकत आहेत. आणखी एक कारण म्हणजे डॉलर मजबूत होणे. डॉलर इंडेक्स 100 पर्यंत पोचलाय. या आठवड्यात डॉलर 2.5 टक्के मजबूत झालाय. मागील तीन वर्षांतील ही चांगली कामगिरी आहे. हिंदुस्थान आता अमेरिका आणि रशियासोबत सहजरित्या व्यापार करू शकणार नाही. हिंदुस्थान आणि अमेरिकेचे नाते कधी सुधारणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी हिंदुस्थानावर 25 टक्के टॅरिफची घोषणा केली. त्याचा परिणाम दुसऱ्याच दिवशी शेअर मार्केटवर दिसून आला. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी हिंदुस्थानी बाजारातून 5600 कोटी रुपये काढले.
मागील महिन्याभरात आयटी सेक्टरमध्ये 10 टक्के घसरण झाली. एका रिपोर्टनुसार हिंदुस्थानातील 9 खासगी बँकांची वाढ केवळ 2.7 टक्के राहिली. यावरून अर्थव्यवस्था धीमी वाटचाल करत आहे. यामुळे लोक जास्त कर्ज घेत नाहीत.