दोन देशांतील संघर्षात जगभरातील देश धावून येणे नैसर्गिक, ट्रम्प यांच्याशी चर्चा केल्याची परराष्ट्र मंत्र्यांची कबुली

हिंदुस्थान आणि पाकिस्तानात झालेला शस्त्रसंधी करार हा द्विपक्षीयच आहे. यात अमेरिकेचा काहीही संबंध नाही, असे सांगतानाच जेव्हा दोन देशांमध्ये संघर्ष होतो तेव्हा साहजिकच जगभरातील विविध देश संपर्क करतात, धावून येतात, हे नैसर्गिक आहे, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. अशा प्रकारे शस्त्रसंधी करारात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीचा दावा फेटाळणाऱया परराष्ट्र मंत्र्यांनी ट्रम्प यांच्याशी याप्रकरणी चर्चा झाल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे यावरून विरोधक मोदी सरकारला घेरण्याची शक्यता आहे.

हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय चर्चा करूनच शस्त्रसंधीचा निर्णय घेण्यात आला. मात्र जर भविष्यात पहलगामसारखा दहशतवादी हल्ला पुन्हा झाला तर पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना पुन्हा मारू, ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप संपलले नाही, असेही ते म्हणाले. ‘एनओएस’ या डच ब्रॉडकास्टरला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेच्या दृष्टीने विविध मुद्दय़ांवर भाष्य केले.