नरभक्षक बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घाला! वनमंत्र्यांचे आदेश

नागरी वस्ती आणि शेतात होत असलेले बिबट्यांचे हल्ले हा गंभीर विषय आहे. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. यापुढे जर गावात संशयास्पद बिबट्या आढळला तर त्याला ऑन द स्पॉट शूट करा, असे आदेशच वनमंत्री गणेश नाईक यांनी आज दिले.

वनमंत्री गणेश नाईक यांनी शिरूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या रोहन बोंबे, शिवन्या बोंबे आणि भागूबाई जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. या भेटीदरम्यान त्यांनी बिबट्याच्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची ग्रामस्थांना माहिती दिली. यापुढे अशा घटना घडणार नाहीत याची आम्ही दक्षता घेऊ. एखाद्या भागात संशयास्पद बिबट्या आढळला तर त्याला थेट गोळ्या घाला, असे आदेशच वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. लोकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी आणि भविष्यात असे जीव वाचवण्यासाठी ही कठोर उपाययोजना आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. वनखात्याला सतर्क राहण्याचे आणि वनमित्रांच्या मदतीने दक्षता घेण्याचे निर्देशही गणेश नाईक यांनी दिले.

बिबट्यांची संख्या कमी करण्यासाठी त्यांची नसबंदी करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून केंद्राशी समन्वय साधून निर्णय घेणार, असे ते म्हणाले.

बिबट्यांना पकडण्यासाठी 1200 पिंजरे

चंद्रपूरमध्ये वाघांच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी वापरण्यात आलेले सॅटेलाईट आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आधुनिक तंत्रज्ञान पुणे आणि नगर जिह्यांत बिबट्यांसाठी वापरण्यात येणार आहे. पुणे आणि नगर जिह्यातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरिता प्रत्येकी 11 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय, बिबट्यांना पकडण्यासाठी 1200 पिंजरे कार्यान्वित केले जातील, अशी माहिती गणेश नाईक यांनी दिली.

बिबट्यांची संख्या एवढी वाढली आहे, की जशी कुत्री रस्त्यावर फिरतात तसे बिबटे रस्त्यावर फिरतील. त्यामुळे बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी कठोर उपाययोजना करणं गरजेचं आहे.

पकडलेले बिबटे वनतारात

पिंजरे लावून बिबट्यांना पकडले जाईल आणि ज्या राज्यांत बिबट्यांची संख्या कमी आहे तेथे ते पाठविण्यात येतील. आता पकडलेले बिबटे वनताराला घेऊन जायला सांगणार. अन्य देशातही बिबटे पाठविण्याचा विचार आहे.