
ज्येष्ठ विचारवंत, लेखक व माजी न्यायमूर्ती नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर उपाख्य नानासाहेब यांचे आज पहाटे कर्करोगाच्या दीर्घ आजाराने निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. चपळगावकर यांच्या पार्थिवावर प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. हैदराबाद संस्थानातील मराठवाडा समजून घेऊन या भागाचा इतिहास, सामाजिक, राजकीय वास्तव आपल्या अभ्यासपूर्ण लेखनातून मांडणारे चपळगावकर यांच्या निधनाने स्वातंत्र्य चळवळीतील अनेक बारकावे माहीत असणारा ज्ञानकोश हरपला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन विवाहित कन्या आणि नातवंडे असा परिवार आहे.
नरेंद्र चपळगावकरांनी राजकीय आणि वैचारिक परंपरा हेच लेखनाचे केंद्रस्थान मानले. विधि आणि मराठी विषयातील पदवी संपादन केल्यानंतर लातूरच्या दयानंद महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून, तर छत्रपती संभाजीनगर येथील माणिकचंद पहाडे विधि महाविद्यालयातही अध्यापन केले. 19 जानेवारी 1990 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी त्यांची निवड झाली. ‘राजहंस’चा ‘श्री. ग. माजगावकर स्मृती’ हा वैचारिक लेखनासाठी पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे जीवन गौरव पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशन या संस्थेचा दिलीप चित्रे स्मृती पुरस्कार आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाचा राम शेवाळकर स्मृती पुरस्कार देऊन गौरविलेले नरेंद्र चपळगावकर हे वर्धा येथील 96 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.