
हेरॉईन तस्करी करणाऱ्या चौघांना गुन्हे शाखेच्या युनिट दहाने अटक केली. मोहमद नौशाद सलमानी, विनोद धनराळे, शंकर तुळशीराम भर ऊर्फ बोल्टा आणि शाह मोहमद हनीफ शेख अशी त्यांची नावे आहेत. त्या चौघांकडून 21 लाखांचे हेरॉईन पोलिसांनी जप्त केले आहे.
जोगेश्वरी परिसरात काही जण हेरॉईन तस्करीसाठी येणार असल्याची माहिती युनिट दहाला मिळाली. त्या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक विशाल राजे याच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक यादव, गणेश तोडकर, उपनिरीक्षक इंगळे, पोलीस हवालदार जाधव, डफळे, परब, निर्मळे, निकम, चव्हाण आदींच्या पथकाने सापळा रचला.
शनिवारी रात्री पोलिसांनी ओशिवरा परिसरात सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 47 ग्रॅम हेरॉईन जप्त केले. जप्त केलेल्या हेरॉईनची किंमत 21 लाख 50 हजार रुपये इतकी आहे. ते चौघे हेरॉईनच्या डिलिव्हरीसाठी आले होते. डिलिव्हरी करण्यापूर्वी त्या चौघांना अटक केली. ते चौघे जोगेश्वरी आणि गोरेगाव परिसरात राहतात. मोहमद हा सलूनमध्ये, शंकर हा वॉर्डबॉय तर शाहचे भंगारचे दुकान आहे. विशाल हा खासगी पंपनीत डिलिव्हरी बॉयचे काम करतो. डिलिव्हरी बॉय असल्याने त्याच्यावर कोणाचा संशय येत नव्हता. त्या चौघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.