मूल जन्माला घालण्यासाठी कैद्याला 4 महिन्यांचा जामीन

दिल्ली येथील साकेत कोर्टाने एका कैद्याला त्याचे कुटुंब वाढवण्यासाठी चार महिन्यांचा जामीन दिला. या कैद्याचे लग्न 2022 साली झाले होते. कुटुंब वाढवण्यापासून त्याला अडवता येणार नाही, असे म्हणत कोर्टाने त्याला काही अटीशर्तींसह मुभा दिली. या चार महिन्यांच्या काळात कैदी लंडनला जाईल आणि आपल्या पत्नीसोबत राहील. दिल्लीच्या कालाकाजी परिसरात राहणारा रिधम गिरोत्रा 11 वर्षांपासून एका हत्येप्रकरणी तुरुंगात आहे.

एका घटनेत रिधम गिरोत्राच्या हातून एका तरुणाचा मृत्यू झाला होता. नशेत धुंद रिधमची सोसायटीच्या गार्ड सोबत मारामारी झाली. या मारहाणीत गार्डच्या डोक्याला मार लागून त्याचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून सदोष मनुष्यवधाच्या गुह्याखाली (खून करण्याचा हेतू नव्हता) रिधम तुरुंगात आहे. त्या दरम्यान तो एकदा कोर्टाच्या संमतीने फिलिपाईन्स येथे जाऊन आला होता. यावेळी त्याने पत्नीला भेटण्यासाठी लंडनला जाण्याचा अर्ज केला.

आरोपी रिधमचे लग्न दोन वर्षांपूर्वी झाले असून त्याची पत्नी लंडन येथे एका मल्टीनॅशनल कंपनीत कामाला आहे. ती हिंदुस्थानात येऊ शकत नाही. त्यामुळे कुटुंब वाढवण्यासाठी रिधमने परदेशात जाण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली.