बाप रे… प्रत्येक किलोमीटरवर चार प्रवाशांचा मृत्यू, लोकल ट्रेनच्या ‘सुरक्षित’ प्रवासाचा फज्जा उडाला

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव अधूनमधून लोकल ट्रेनच्या ’सुरक्षित’ प्रवासाचा दावा करतात. प्रत्यक्षात त्यांचा दावा केवळ दिखावा असल्याचे उघड होत आहे. मुंबई लोकलच्या प्रवासात अपघातांचे सत्र सुरुच असून मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर प्रत्येक किलोमीटरवर अनुक्रमे तीन ते चार प्रवाशांना प्राण गमवावा लागत आहे. दोन्ही मार्गांवर गेल्या वर्षी तब्बल 1791 प्रवाशांचा बळी गेल्याची आकडेवारी समोर आली आहे.

2024 मध्ये मध्य रेल्वेवर 1082 आणि पश्चिम रेल्वेवर 709 प्रवाशांचा मृत्यू झाला. हे अपघातांचे सत्र सुरूच असल्याने रेल्वे प्रशासनाचे दावे फोल ठरले आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रवासी सुविधा वाढवण्याबाबत वेळोवेळी घोषणा केल्या. मात्र त्या घोषणा कागदावरच राहिल्याने लोकल ट्रेन प्रवासात मुंबईकरांचे हकनाक बळी जात आहेत. मध्य रेल्वेचा प्रवास अधिक जीवघेणा ठरला आहे. पश्चिम रेल्वेच्या तुलनेत मध्य रेल्वेवर जास्त प्रवाशांनी प्राण गमावले आहेत. 15 वर्षांत मध्य व पश्चिम रेल्वेच्या सेवांमध्ये अपेक्षित वाढ झालेली नाही. 15 डबे असलेल्या लोकल गर्दी कमी करण्यात प्रभावी ठरल्या. मात्र मध्य रेल्वेने 15 डब्यांच्या लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्याच्या दिशेने ठोस पाऊल उचलले नाही. सध्या पश्चिम रेल्वेवर 15 डब्यांच्या लोकलच्या 211 फेऱ्या सुरू आहेत, तर मध्य रेल्वेवर ही संख्या फक्त 22 आहे.

वर्ष – मृत्यू (मध्य – पश्चिम) – प्रति किमी मृत्यू (मध्य – पश्चिम)
2009 – 1782 / 1468 – 5.1 / 8.1
2024 – 1082 / 709 – 3.1 / 3.9

एकूण मार्ग किलोमीटर

मध्य रेल्वे – 350 किमी
पश्चिम रेल्वे – 183 किमी

पश्चिम रेल्वे मार्गावर प्रति किमी मृत्यूदर 51 टक्के आणि मध्य रेल्वे मार्गावर 39 टक्क्यांनी कमी झाला आहे. मृत्यूदर शून्यावर आणण्यात रेल्वे अपयशी ठरली आहे.