
अंधेरी भवन्स कॉलेजमधील चार विद्यार्थ्यांचा मुंबई विद्यापीठाने रखडवलेला निकाल युवासेना सिनेट सदस्यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर मिळाला आहे. तीन वर्षांपूर्वी या चारही विद्यार्थ्यांना बीएसस्सी आयटी अभ्यासक्रम प्रवेशासाठी बारावी गणित विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक असतानाही नजर चुकीने प्रवेश देण्यात आले होते. मात्र आता अपात्र ठरवत निकाल रखडवून ठेवण्यात आला होता.
भवन्स कॉलेजचे हे विद्यार्थी यावर्षी तृतीय वर्षी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने एलिजिबल नसल्याचे सांगत निकाल देण्यास नकार दिला होता. वास्तविक विद्यापीठाने प्रवेश घेतल्यापासून सहा महिन्यांत विद्यार्थ्यांची एलिजिबिलिटी तपास करणे आवश्यक असताना तीन वर्षांचा कालावधी लावला. विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत युवासेनेकडे आलेल्या तक्रारीनंतर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना सिनेट सदस्य शीतल शेठ-देवरुखकर, प्रदीप सावंत, मिलिंद साटम, माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी विद्यार्थी आणि पालकांसह मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे, भवन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कांबळे यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी न्यायालयीन लढाई लढण्यास मदत करण्याचे आवाहन केले.
या अन्यायाबाबत उच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर विद्यार्थ्यांना न्याय मिळाला. या संपूर्ण प्रक्रियेत युवासेना या चारही विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठाम उभी राहिल्यानेच या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला. अखेर विद्यार्थ्यांना न्याय मिळाल्याबद्दल पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासन आणि युवासेनेचे मनापासून आभार मानले.