सात महिन्यात चार हजार शस्त्रक्रिया; ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयाचा रेकॉर्ड

सिव्हिल रुग्णालयाने सात महिन्यात चार हजार २७१ शस्त्रक्रिया करून नवा रेकॉर्ड रचला आहे. त्यात रुग्णालय प्रशासनाने सिझेरियन (एल एससीएस), लेप्राटॉमी हर्निया टॉमी, डोळे, अस्थीरोग, दात, कान-नाक-घसा, स्तनांचे कॅन्सर, डिब्रुयमेंट इसिजन अॅण्ड ड्रेनेज यासारखा खर्चिक व अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत. खिशाला न परवडणाऱ्या महागड्या शस्त्रक्रियाही मोफत होत असल्याने गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने हे रुग्णालय तात्पुरत्या स्वरूपात वागळे इस्टेट येथील मनोरुग्णालयाजवळ स्थलांतरित करण्यात आले आहे. मात्र तरीही दररोज ५०० रुग्ण या रुग्णाल यात उपचारासाठी दाखल होतात, तर दर महिन्याला रुग्णालयाकडून जवळपास ५५० ते ६०० शस्त्रक्रिया केल्या जातात. गेल्या सात महिन्यात २ हजार ३२६ अवघड आणि १ हजार ९४५ किरकोळ शस्त्रक्रियांचा समावेश आहे. त्यात लेप्राटॉमी हर्निया टॉमी, सिझेरियन सेक्शन हायड्रोसिल, दात किंवा स्तनांचा कॅन्सर अशा अवघड शस्त्रक्रियांचा समावेश आहे.

किशोरवयीन मुलांमध्ये हार्मोनल बदलांमुळे निर्माण होणाऱ्या ‘गायनिकोमास्टिया’वर अत्यंत खर्चिक ‘रिडक्शन आणि लिपोसक्शन’ शस्त्रक्रियादेखील रुग्णालयाकडून यशस्वीरीत्या करण्यात आली आहे. या सर्व शस्त्रक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या.