Chandrapur News – रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकला कारची धडक; अपघातात 4 तरुण ठार

चंद्रपूरमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याने चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला. भोयेगाव गडचांदूर मार्गावर ही घटना घडली. सूरज गव्हाले, सुनील किजगीर, आकाश पेंदोर, श्रेयश पाटील अशी मयत तरुणांची तर अजय गायकवाड असे गंभीर जखमीचे नाव आहे.

अपघातात मरण पावलेले चारही तरुण जिवती तालुक्यातील रहिवासी आहेत. अपघाताची माहिती मिळताच गडचांदूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. गंभीर जखमी युवकास उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात पाठवले. याप्रकरणी पुढील तपास गडचांदुर पोलीस करीत आहेत.