Free Traffic Movement – मणिपूरमध्ये कुकी समुदायाची सुरक्षा दलांशी झटापट, एकाचा मृत्यू; 27 जवान जखमी

मणिपूरमध्ये फ्री ट्रॅफिक मुव्हमेंटच्या पहिल्याच दिवशी कुकी समुदाय आणि सुरक्षा दल यांच्यामध्ये झटापट झाली. या झटापटीत एकाचा मृत्यू झाला तर 27 जवान जखमी झाले. इंफाळ-दिमापूर महामार्गावर (NH-2) सर्व वाहनांना मुक्त हालचालीची अंमलबजावणी करण्यात आली. याला कुकी समुदायाचा विरोध दर्शवत रास्ता रोको केला. यावेळी गर्दीला पांगवण्यासाठी सुरक्षा दलाने बळाचा वापर केल्यानंतर हिंसाचार उफाळला.

मणिपूरमध्ये गेली दोन वर्षे सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 1 मार्च रोजी बैठक घेतली होती. या बैठकीत राज्यातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेत 8 मार्चपासून मणिपूरमधील प्रमुख मार्गांवर फ्री ट्रॅफिक मुव्हमेंट लागू करण्याचे निर्देश अमित शहा यांनी दिले होते. तसेच अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देशही दिले होते.

निर्देशानुसार, केंद्रीय राखीव पोलीस दलाने राज्य प्रशासनाच्या सहकार्याने 8 मार्चपासून फ्री ट्रॅफिक मुव्हमेंट सुरू केली. मात्र मणिपूरच्या डोंगराळ जिल्ह्यांसाठी स्वतंत्र प्रशासकीय व्यवस्थेची मागणी पूर्ण होईपर्यंत कुकी समुदायाला फ्री ट्रॅफिक मुव्हमेंट नको आहे. याच कारणातून कुकी समुदायाला या मुव्हमेंटला विरोध करत रास्ता रोको केला.

यावेळी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षा दलांनी लाठीचार्ज केला, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या कारवाईत काही आंदोलक जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला.