ज्येष्ठ गांधीवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक जी. जी. पारीख यांचे निधन

ज्येष्ठ गांधीवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉ. जी. जी. पारीख यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. मागील वर्षी डिसेंबरमध्येच त्यांनी वयाची शंभरी पार केली होती. डॉ. पारीख यांच्या निधनाने देशाच्या स्वातंत्र्यलढय़ाचा चालताबोलता इतिहास आणि समाजवादी मूल्यांची रुजवात करणारा लढवय्या विचारवंत हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

जी. जी. पारीख यांनी आयुष्यभर महात्मा गांधींच्या विचारसरणीला अनुसरून वाटचाल केली. गांधी जयंतीदिनीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी देहदानाचा निर्णय घेतला होता, त्यानुसार त्यांचे पार्थिव जे. जे. रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आले. तत्पूर्वी ताडदेव येथील जनता केंद्रात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांनी अंत्यदर्शन घेऊन शिवसेनेच्या वतीने जी. जी. पारीख यांना श्रद्धांजली वाहिली. कॉ. प्रकाश रेड्डी, डॉ. भालचंद्र मुणगेकर, मधु मोहिते, सुनीलम, माधव चव्हाण, नितीन आणेराव, शीरथ सातपुते यांच्यासह राष्ट्र सेवा दल, अपना बाजार परिवार आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनीही जीजींचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.

गांधीवादी चळवळीचा अखेरचा शिलेदार

गुजरातमध्ये 30 डिसेंबर 1924 रोजी जन्मलेल्या जीजींनी महाराष्ट्र ही आपली कर्मभूमी मानली. गांधीजींनी ‘छोडो भारत’ची घोषणा दिली आणि गांधीजींच्या विचारांनी भारावलेले जीजी स्वातंत्र्यलढय़ात सक्रिय झाले. पुढे आणीबाणीच्या काळात केलेल्या आंदोलनामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. विद्यार्थी चळवळ, कामगार संघटना, सहकार चळवळ या सगळय़ात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. महात्मा गांधी यांच्या विचारांनुसार खादीचे पुनरुज्जीवन, वंचित-दुर्बल घटकांना रोजगाराचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवणे, स्वतःची वैद्यकीय सेवा सांभाळून दूर खेडोपाड्यातील आदिवासी-गरीबांना उपचार मिळवून देण्यासाठी ठोस प्रयत्न करणे अशा विविध स्वरूपातून ते शेवटपर्यंत कार्यरत राहिले.

युसुफ मेहेरअली सेंटरचे अनमोल कार्य

रायगड जिह्यात उभ्या राहिलेल्या युसुफ मेहेरअली सेंटरच्या माध्यमातून जीजींनी वंचित आणि दुर्बल घटकांना स्वावलंबी बनवणे, त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती करण्याचे काम केले. ‘युसुफ मेहेरअली सेंटर’, ‘युवक बिरादरी’च्या माध्यमातून देशभरात त्यांनी आपल्या कार्याचा विस्तार केला. तेल घाणी, साबण बनविणे, मातीची भांडी-खेळणी बनविणे, सुतारकाम, डेअरी, गांडूळ खत प्रकल्प, सेवाग्राम अशा विविध माध्यमांतून त्यांनी वंचितांसाठी रोजगार निर्मिती केली.