
फ्रांसमध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्या असून यामध्ये डाव्या विचारसरणीच्या आघाडीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. फ्रांसच्या निवडणुकीच्या निकालांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. सर्व दावे आणि एक्झिट पोलच्या विरुद्ध डावी आघाडी सर्वाधिक जागा मिळवून देशात पहिल्या क्रमांकावर आली आहे. उजव्या पक्षांची आघाडी अत्यंत मजबूत मानली जात असली तरी ती तिसऱ्या क्रमांकावर राहिली. मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही.
सीएनएनच्या वृत्तानुसार, फ्रान्सच्या गृह मंत्रालयाने रविवारी झालेल्या निवडणुकीच्या अंतिम निकालाची माहिती देताना सांगितलं की, डाव्या आघाडीच्या न्यू पॉप्युलर फ्रंटने सर्वाधिक 182 जागा जिंकल्या आहेत.
इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या मध्यवर्ती एन्सेम्बल पक्षाने 163 जागा जिंकल्या. विजयाचा दावेदार मानली जाणारी कट्टर उजवी आघाडी तिसऱ्या क्रमांकावर राहिली. नॅशनल रॅली आणि त्यांच्या मित्रपक्षांना केवळ 143 जागा जिंकता आल्या. मंत्रालयाने सांगितलं की, देशात एकूण 66.63% मतदान झाले.
कोणत्याही पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही!
कोणत्याही पक्षाने पूर्ण बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 289 जागा जिंकल्या नाहीत, ज्यामुळे फ्रांस राजकीय अस्थिरतेकडे जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे संसदेचे डावे, मध्यवर्ती आणि उजवे असे तीन गटांमध्ये विभाजन होण्याची शक्यता आहे. तिन्ही आघाड्यांचा अजेंडा खूप वेगळा असून देशात एकत्र काम करण्याची परंपरा नाही, असंही सांगण्यात येत आहे.
इमॅन्युएल मॅक्रॉन यांना मोठा धक्का
मध्यवर्ती राष्ट्राध्यक्ष इमान्युअल मॅक्रॉन यांनाही निवडणूक निकाल हा मोठा धक्का आहे. गेल्या महिन्यात युरोपियन संसदेच्या निवडणुकीत आरएनच्या हातून पराभव झाल्यानंतर राजकीय बलाबल स्पष्ट करण्यासाठी त्यांनी निवडणुका जाहीर केल्या होत्या.
मॅक्रॉन यांच्या पक्षातून पंतप्रधान होणार नाही
संसदीय निवडणुकांनंतर, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष सहसा सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाकडून पंतप्रधानाची नियुक्ती करतात. बहुसंख्य प्रसंगी ही व्यक्ती ज्या पक्षाचे अध्यक्ष आहे त्याच पक्षाची असते. मात्र, रविवारच्या निकालानंतर मॅक्रॉन यांना डाव्या आघाडीतून कोणाची तरी नियुक्ती करण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. स्टॅलिनग्राड स्क्वेअरजवळ समर्थकांना संबोधित करताना, डाव्या विचारसरणीचे नेते मेलेंचॉन म्हणाले की, नवीन लोकप्रिय आघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी बोलावणे हे मॅक्रॉन यांचे कर्तव्य आहे’.
रॉयटर्सच्या मते, फ्रान्सच्या संविधानानुसार, मॅक्रॉन डाव्या गटाला सरकार स्थापन करण्यास सांगण्यास बांधील नाहीत. मात्र, संसदेतील सर्वात मोठा गट असल्याने तसे करणे परंपरेनुसारच होईल.
निकालांनंतर सर्व पक्षांचे समर्थक उतरले रस्तावर; कुठे आनंदोत्सव तर कुठे हिंसाचार
निवडणूक निकालांनंतर विविध पक्षाचे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. पंतप्रधान गॅब्रिएल अट्टल यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. काही ठिकाणी डाव्या पक्षांच्या आघाडीच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला तर काही ठिकाणी विविध पक्षांच्या समर्थकांमध्ये वाद होऊन त्याची परिणिती हिंसाचारात झाली. व्हायरल व्हिडिओ फुटेजमध्ये मुखवटा घातलेले निदर्शक रस्त्यावरून धावत आहेत, जाळपोळ करत आहेत असे चित्र पाहायला मिळत आहे. तर परिस्थिती आणखी चिघळू नये म्हणून दंगलविरोधी पोलीस पथकं देशभरात पाठवण्यात आली आहे.
दंगल विरोधी पथकातील अधिकारी गर्दीचं व्यवस्थापन करत आहेत. तर काही भागात दंगेखोरांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर करण्यात आला आल्याचं सांगण्यात आलं आहे.
काय आहे डाव्या आघाडीचा जाहीरनामा
पॉप्युलर फ्रंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजयी डाव्या विचारसरणीच्या आघाडीमध्ये फ्रान्सचा समाजवादी पक्ष, फ्रेंच कम्युनिस्ट पक्ष, पर्यावरणशास्त्रज्ञ आणि फ्रान्स अनबोव्हड यांचा समावेश आहे.
त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये मॅक्रॉन यांच्या काळातील पेन्शन सेवा बदलांना दूर करणे आणि सार्वजनिक क्षेत्रातील वेतन वाढवणे, संपत्ती कर पुनर्स्थापित करणे आणि फ्रान्सचे किमान वेतन वाढवणे या योजनांसह सेवानिवृत्तीचे वय 60 करण्यासाठी प्रयत्न करणे अशा गोष्टींचा समावेश आहे.