
तरुणाईसाठी आकर्षण ठरलेल्या राजाबहादूर मिल्स परिसरातील ‘किकी’ नावाच्या पबमध्ये शनिवारी रात्री फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या पार्टीत अल्पवयीन मुलांना कुठलेही ओळखपत्र न पाहता सरसकट प्रवेश देऊन दारू पुरविल्याचा आरोप होत आहे. मात्र प्रशासनाकडून हे नाकारण्यात आले. प्राथमिक पाहणीत असे आढळले नसले तरी सखोल तपास करण्यात येत असल्याचे उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.
गेल्या काही वर्षांत पुण्यात पब संस्कृती झपाटय़ाने वाढत असून कोरेगाव पार्क, येरवडा, बाणेर परिसरातील पब्समध्ये असेच प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत. रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या पाटर्य़ा, अल्पवयीन मुलांना दिला जाणारा प्रवेश, हुक्का व ड्रग्जचा वापर यामुळे शहराची प्रतिमा धोक्यात येत असल्याची टीका नागरिकांकडून वारंवार होत आहे. याआधीही शहरातील काही पब्सवर धाड टाकण्यात आल्या होत्या, पण काही दिवसांत पुन्हा तेच प्रकार सुरू झाले. प्रशासनाकडून ठोस व कायमस्वरूपी कारवाई न झाल्याने पबमालक बेफिकीर झाले आहेत. दरम्यान, शनिवारी बंडगार्डन परिसरातील राजा बहाद्दूर मिलमधील किकी नावाच्या पबमध्ये नामांकित कॉलेजच्या तरुणांसाठी फ्रेशर्स पार्टीचे आयोजन केले होते.