अॅशेसनंतर ऑस्ट्रेलियन कसोटीपटू थेट बीबीएलमध्ये

अॅशेस मालिकेत इंग्लंडवर 4–1 असा दणदणीत विजय मिळवून अवघे तीन दिवस होत नाहीत तोच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ बिग बॅश लीगमध्ये (बीबीएल) सिडनी सिक्सर्ससाठी मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे. उस्मान ख्वाजा आणि मार्नस लाबुशेन यांनाही इंग्लंडविरुद्ध कसोटी खेळल्यानंतर केवळ 48 तासांत बीबीएलमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. अंतिम टप्प्यातील बीबीएल सामन्यांसाठी बहुतेक कसोटी खेळाडूंना मुक्त करण्यात आले असून मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू मिचेल स्टार्प तब्बल 11 वर्षांनंतर प्रथमच बीबीएल खेळणार आहे. मात्र ट्रव्हिस हेडने टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी विश्रांती घेण्याचा निर्णय घेत स्पर्धेतून माघार घेतली आहे. स्काॅट बोलंड सलग पाच कसोटी सामने आणि सर्वाधिक षटके टाकल्यामुळे अनुपलब्ध आहे, तर कॅमेरून ग्रीनही काही आठवडे विश्रांती घेणार आहे. स्मिथ सिक्सर्ससाठी उर्वरित तीन साखळी सामने खेळणार असून, संघाच्या प्ले-ऑफच्या आशा अधिक बळकट होतील.