क्रिकेटवारी – यशस्वीला संधी द्या!

>> संजय कऱ्हाडे

हल्ली वन डे मालिका नावडत्या पाहुण्यासारखी वाटू लागलीय! टीव्हीचा प्रभाव वाढतोय, टी-ट्वेंटीमुळे चौकार अन् षटकार पाहण्याची हौस अधिक जिवंत झाली आहे, तंत्राला यंत्राने बाद करून टाकलं आहे, खेळपट्ट्या गोलंदाजांना सावत्र वागणूक देताना दिसतायत. टी- ट्वेंटीमुळेच चटपट निर्णयाची सवय जडलीय अन् पर्यायाने शंभर षटपं संयम बाळगण्याची सवय मोडून पडलीय. त्यातही टी–ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धा हाकेच्या अंतरावर आलेली असताना तसं वाटणं अतर्क्य म्हणता येणार नाही.

तरीही न्यूझीलंडविरुद्धची ही मालिका आपली उत्सुकता वाढवणारी ठरू शकते. दुखापतीमुळे असो की धावा होत नसल्यामुळे डच्चू दिला असं म्हणा, पण तोच शुभमन कप्तान म्हणून परततोय! त्यामुळे त्याच्या बॅटला कंठ फुटतो की नाही याकडे आपलं आणि त्याचं स्वतःचंही लक्ष राहील. परंतु आपल्या शेवटच्या खेळीत शतक फटकावणाऱया यशस्वीलासुद्धा संधी मिळावी. अर्थात, शुभमनने सलामीला जाण्याचा हट्ट कायम ठेवला तर मात्र पंचाईत होईल. पण फलंदाजीचा सूर ध्यानात ठेवला तर रोहित-यशस्वीची जोडी कामयाब होऊ शकते. की यशस्वीला मधल्या फळीत खेळवणार? दर्जेदार ऋषभचाही प्रश्न आहेच. त्याला जागा मिळणार की यशस्वी आणि ऋषभमध्ये टॉस उडवणार? हे एक त्रांगडच होऊन बसलंय! अर्थात, शिस्त नावाच्या मैत्रिणीचा शोध ऋषभने आतापर्यंत घेतलेला असेल अशीही मला अपेक्षा आहे. अन्यथा, सुंदर आहेच.

रोहित आणि विराटसाठी तर ही मालिका पक्वान्नांच्या जेवणानंतर मघई पानासारखी असेल. कारण या तीन वन डे सामन्यांनंतर तब्बल सहा महिने वन डे मालिकाच खेळली जाणार नाहीय. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱयापासून रोकोने कौरी-कौरीने वाढवत नेलेला चंदामामा पौर्णिमा दाखवतो की नाही हेसुद्धा पाहण्याची उत्सुकता आहे!
आता बात श्रेयसची. सिडनीत अॅलेक्स पॅरीचा झेल उलट धावून झेपावत घेताना तो जखमी झाला होता. सहा आठवडय़ांनंतर हा गुणी फलंदाज पुन्हा पाहायला मिळणार आहे. त्याला संपूर्ण संधी मिळायलाच हवी. मैदानावर तो प्रत्येक वेळी आपलं सर्वस्व पणाला लावताना दिसतो.

संधी उपलब्ध करून देणाऱया भगवंताच्या शोधात शमी, ऋतुराज आणि सर्फराजप्रमाणे आणखीही काही आहेत. त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा!

संघामध्ये अष्टपैलू जडेजा अन् त्याला साथ द्यायला कुलदीपचा समावेश करावा असं वाटतं. तीन वेगवान गोलंदाज म्हणून सिराज, अर्शदीप आणि हर्षित असतीलच.

न्यूझीलंडचा संघ तब्बल सात अष्टपैलू खेळाडू घेऊन वडोदरामध्ये पधारलेला आहे. त्यात प्रामुख्याने असणार आहेत डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स अन् त्यांचा म्होरक्या असेल मायकल ब्रेसवेल. ब्रेसवेलचं अख्खं कुटुंब क्रिकेटच्या मैदानावर उतरलेलं आहे. त्याचा बाबा मार्क ब्रेसवेल ओटॅगोसाठी पहिल्या दर्जाचं क्रिकेट खेळलाय, मध्यमगती अष्टपैलू काका ब्रेंडन आणि ऑफस्पिनर जॉन ब्रेसवेल आणि चुलत भाऊ डगसुद्धा न्यूझीलंडसाठी कसोटी खेळलेत. सलामीवीर विल यंग आणि हेन्री निकल्ससहित भरोसेमंद यष्टिरक्षक फलंदाज डेवन माल्कम आहेच.

असो, आपल्यापुरतं बोलायचं तर काही-काहींच्या यशाची तर काही-काहींच्या अपयशाची प्रार्थना मोठ्या चुरशीने करत असतील, म्हणूनही नावडती असली तरी ही वन डे मालिका आपलं मनोरंजन करील यात वाद नाही!