
पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल दीपक मोदी याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) यांच्या संयुक्त आवाहनावरून 4 जुलै रोजी अमेरिकेच्या न्याय विभागाने अटक करण्याची कारवाई केली. देशातील सर्वात मोठ्या बँकिंग घोटाळ्याच्या तपासात हे एक मोठे राजनैतिक आणि कायदेशीर यश मानले जात आहे.
केंद्र सरकारच्या औपचारिक प्रत्यार्पणाच्या विनंतीनुसार नेहल मोदीला अटक करण्यात आली आहे. तसेच आता त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. अमेरिकन अभियोक्त्याने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, दोन मुख्य आरोपांच्या आधारे नेहल मोदीविरुद्ध प्रत्यार्पणाची कारवाई सुरू आहे. नेहल मोदी प्रत्यार्पण प्रकरणातील पुढील सुनावणी 17 जुलै रोजी होणार आहे. नीरव मोदीला कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर संपत्ती लपवण्यासाठी आणि ती शेल कंपन्या आणि परदेशी व्यवहारांद्वारे देशाबाहेर नेण्यास मदत केल्याचा आरोप नेहलवर आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या आरोपपत्रात नेहल मोदीचे सह-आरोपी म्हणून नाव आहे आणि त्याच्यावर पुरावे नष्ट करण्याचाही आरोप आहे.
2019 मध्ये इंटरपोलने नेहल मोदीविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. यापूर्वी त्याचा भाऊ नीरव आणि निशाल मोदी यांच्याविरुद्धही इंटरपोलच्या नोटीस जारी करण्यात आल्या आहेत. नेहल हा बेल्जियमचा नागरिक आहे आणि त्याचा जन्म अँटवर्पमध्ये झाला होता. त्याला इंग्रजी, हिंदी आणि गुजराती भाषा येतात. नीरव मोदी सध्या यूकेमधील तुरुंगात आहे आणि त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू आहे. नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी हे पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख गुन्हेगार आहेत. त्यांनी पंजाब नॅशनल बँकेचे 13 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान केले आहे.