बुरशीजन्य रोगांचा सीताफळावर प्रादुर्भाव; उत्पादकांची चिंता वाढली

पुरंदर तालुक्यात सीताफळ हे शेतकऱ्यांचे महत्त्वाचे आर्थिक उत्पादनाचे साधन आहे. मात्र, सद्यस्थितीतील सीताफळाचा हंगाम तोट्याचा ठरत असून, सीताफळांवर काळ्या, पांढऱ्या बुरशीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. फ्रूट रॉट आणि ब्लॅक कॅन्कर या बुरशीजन्य रोगामुळे सीताफळ पिक धोक्यात आले आहे.

पुरंदर तालुक्यातील सीताफळाचा पावसाळी बहार सध्या सुरू आहे. मात्र, फळधारणेच्या वेळी शेतकऱ्यांच्या चुकांमुळे सीताफळावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अयोग्य छाटणी व जुनी रोगाट फळे काढण्याकडे दुर्लक्ष केल्याने फटका बसत असून, सीताफळावर काळे डाग पडू लागले आहेत.

पुरंदर तालुक्यात सुमारे ५५०० हजार एकर सीताफळ क्षेत्र आहे. एकरी १६० झाडे असून, तालुक्यात जवळपास ८ लाख ८० हजार सीताफळाची झाडे आहेत. सध्या काळ्या बुरशी व पिठ्या ढेकून या रोगांमुळे सीताफळाच्या उत्पादनात घट झाली आहे. सीताफळाच्या देठाजवळ काळे डाग पडण्याचे प्रमाण वाढले आहे. हवेतील आर्द्रता आणि रिमझिम पावसामुळे सीताफळाच्या देठाकडील भागात दव आणि पाणी साचून बुरशी वाढत आहे.

फळांवर होत असलेल्या बुरशीजन्य रोगांमुळे सीताफळ उत्पादकांना औषध फवारणीचा खर्च वाढत असून, आर्थिक नुकसान होत आहे. त्यातच बाजारभावातही चचढ-उतार पाहावयास मिळत असल्याने सीताफळ सापडला आहे. उत्पादक शेतकरी अडचणीत

सीताफळाच्या दरावर परिणाम
पुरंदरमधील बाजारपेठेत बुरशीजन्य फळांना प्रती कॅरेट साधारण २५० ते ३०० रुपये, असा अत्यल्प बाजारभाव मिळत आहे. बाजारामध्ये ३० टक्के काळ्या, पांढऱ्या बुरशीजन्य फळांची आवक होते. फक्त मोठ्या आकाराची काळी फळे ही कमी बाजारभावात खरेदी केली जातात. परंतु लहान आकाराच्या फळांना गोवा व गुजरात आणि इतर बाजारपेठांत कवडीमात्र किंमत मिळत नाही, अशी माहिती सीताफळ व्यापारी यांनी दिली.