
राष्ट्रीय महामार्गावर यू टर्न घेताना मालवाहू ट्रकने कारला धडक दिल्याने भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी चार्मोशी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आष्टी-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी ही घटना घडली.
विनोद पुंजाराम काटवे, राजू सदाशिव नैताम आणि सुनील वैरागडे अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर अनिल मारोती सातपुते असे जखमीचे नाव आहे. हे चौघेही जण कारने आष्टीकडे चालले होते. चार्मोशी ग्रामीण रुग्णालयासमोर कारचालकाने अचानक यू टर्न घेतला. यावेळी मागून येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. यात कारमधील तिघांचा मृत्यू झाला तर एक जखमी झाला. अपघातात कारचाही चक्काचूर झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी अपघातग्रस्त कार बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.