मालाडच्या ‘गोविंद नगरच्या राजा’च्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी; सांस्कृतीक, सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल

>> योगेश जोशी

मालाड पूर्वेतील गोविंद नगर येथील बाळ गोपाळ मित्र मंडळाचा गणेशमूर्तीची गोविंद नगरचा राजा अशी ओळख आहे. या गणेश मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक टिश्यू पेपरपासून साकारलेली मूर्ती आणण्यात येते. ही मूर्ती आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. अत्यंत रेखीव आणि सुबक मूर्ती पाहून भआविक सुखावतात.

हे वर्ष मंडळाचे 52 वे वर्ष असून यंदाही टिश्यू पेपरपासून साकारलेली सुमारे साडे चौदा फूटांचे गणेशमूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. गोविंद नगरच्या राजाची ही टिश्यू पेपरपासून बनवलेली कागदी मूर्ती दिपक गणपत रावणंग यांनी साकारली असून त्यावर डायमंड वर्क मनिष पोवार यांनी केले आहे. तसेच मंडळाकडून सजावटीसाठी पर्यावरणपूरक वस्तूंचाच वापर केला जातो. दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही मंडळाने विविध उपक्रम आयोजित केले आहेत. रविवारी लहान मुलांसाठी चित्रकला आणि गणेशस्त्रोत पठण स्पर्धा घेण्यात आली. तर बुधवारी (दि. 3) रोजी आरती थाळी सजावट स्पर्धा घेण्यात येणार आहे. तसेच शुक्रवारी (दि.५) रोजी श्री सत्यनारायण महापूजा होणार आहे. तसेच या दिवशी बाप्पाला 56 भोग अर्पण करण्यात येणार आहे. तसेच 1001 दिव्यांची आकर्षक आरास करण्यात येणार आहे. आकर्षक मूर्ती आणि नवसाला पावणारा अशी मान्यता असल्याने या ठिकाणी भाविकांची गर्दी होत आहे. तसेच मंडळाच्या विविध उपक्रमांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.