
मुंबईमध्ये गुरुवार दुपारपासून दीड दिवसांसाठी स्थापन केलेल्या सुमारे 30 हजार गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये 29 हजार 614 घरगुती मूर्तींचा समावेश आहे. पालिकेकडून विसर्जनासाठी तब्बल 300 कृत्रिम तलावांची व्यवस्था केली असून भाविकांनी विसर्जनासाठी नैसर्गिक जलस्रोतांऐवजी कृत्रिम तलावांनाच प्राधान्य दिले. पालिका आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने दीड दिवसांच्या बाप्पाचे निर्विघ्नपणे विसर्जन पार पडले.
मुंबईसह राज्यात सर्वांच्या लाडक्या बाप्पाची काल बुधवारी मनोभावे स्थापन करण्यात आली. दीड दिवसांसाठी स्थापना करण्यात आलेल्या बाप्पाला आवडत्या मोदकासह गोडधोड नेवैद्य दाखवत विधिवत पूजा करण्यात आली. दिवसरात्र भजन, कीर्तन आणि आरती करून बाप्पाची सेवा करण्यात आली. यानंतर आज बाप्पाला निरोप देण्यात आला. ढोल ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत बाप्पाला निरोप देण्यात आला.
पालिकेकडून नियोजनबद्ध व्यवस्था
- महापालिकेने, विसर्जन स्थळी निर्माल्य कलश, समुद्र, खाडीच्या ठिकाणी विसर्जन करताना कोणीही समुद्रात बुडू नये यासाठी जीवरक्षक, मोटार बोट, नियंत्रण कक्ष, मोबाईल टॉयलेट, निरीक्षण मनोरे, वैद्यकीय मदत, विद्युत व्यवस्था, रुग्णवाहिका, आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
- उंच गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी नैसर्गिक विसर्जन स्थळी क्रेनची व्यवस्थाही करण्यात आली आहे. विसर्जन स्थळी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आजच्या विसर्जनप्रसंगी कोणतीही दुर्घटना घडली नसल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.