
महानगरपालिकेने शीव येथील तलावात गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यास बंदी घातल्याने मोठय़ा मूर्तीचे विसर्जन कसे करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. शीवमधील तलावाच्या ठिकाणी याबाबत पालिकेने फलक लावल्याने गणेशभक्तांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पालिकेच्या या अन्यायकारक आदेशाला शिवसेनेने विरोध केला असून तलावांत विसर्जनासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशाचे कारण देत सांगत पालिकेने गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावांतच करणे बंधनकारक केले आहे. मात्र पालिकेच्या या निर्णयाला शिवसेनेने विरोध केला आहे. पालिकेकडून उभारण्यात येणाऱ्या कृत्रिम तलावांची खोली ही फक्त 4 फुटांपर्यंतच असते. तर मंडळांसह काही घरगुर्ती मूर्तीदेखील पाच ते दहा फुटांपर्यंत असतात. या मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित कशा करणार, असा सवाल शिवसेनेचे शीव-कोळीवाडा विधानसभा प्रमुख गोपाळ शेलार उपस्थित केला आहे.
गणेशभक्तांच्या आस्थेला धक्का
शीव येथील कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित केलेल्या शेकडो मूर्ती रात्री टेम्पोत भरून सरसकट याच तलावात अक्षरशः फेकून दिल्या जातात. मूर्तींची हाताळणी आणि विसर्जन योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळे गणेशभक्तांच्या आस्थेला धक्का पोहोचतो. भावना दुखावल्या जातात. त्यामुळे पालिकेने नैसर्गिक तलावांमध्ये गणेश मूर्ती विसर्जनाची परवानगी द्यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने गोपाळ शेलार यांनी केली आहे.